पुढारी ऑनलाईन डेस्क : महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा प्रकटदिन भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस राज्यभरात 'अवतार दिन ' म्हणून साजरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने आज याबाबतचे परिपत्रक जारी केले. भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात सत्य, अहिंसा, मानवता, समानता ही मूल्ये समाजाला दिली. त्यांच्या विचारांचा आजदेखील आपल्या समाजावर मोठा प्रभाव आहे.
महायुती सरकारचा हा निर्णय चक्रधर स्वामींच्या कार्य व विचारांना अभिवादन आहे. यापूर्वी, रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णयही देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. अवतार दिन साजरा करत असताना कोणते कार्यक्रम आयोजित केले जावेत याबाबत स्वतंत्र सूचना दिल्या जाणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे महानुभव पंथांच्या शिकवणीचा राज्यभरात गौरव होणार आहे.