मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांबरोबरच मच्छिमारांनाही आर्थिक मदत जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये पूर्णत: नष्ट झालेल्या बोटीसाठी १५ हजार रूपये, तर बोटीच्या अंशत: दुरूस्तीसाठी ६ हजार रूपये देण्यात येणार आहे. यासंदर्भात बुधवारी (दि. २९) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.
अतिवृष्टी आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे जलाशयातील मत्स्यसाठा, मत्स्यबीज, नौका व जाळी तसेच मत्स्यबीज केंद्राचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या मत्स्यव्यवसायिकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या निकषावर द्यावयाच्या मदतीचे दर निश्चित करण्यात आले असले तरी या प्राधिकरणाच्या निकषात न बसणाऱ्या नुकसानीच्या मदतीसाठी राज्य निधीमधून भरपाई देण्यासाठी विशेष मदत पॅकेजही घोषित करण्यात आले आहे.
या पॅकेजनुसार मत्सव्यावसायिकांना मदत देण्याची कार्यप्रणाली आता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार आता बोटीच्या अंशत: दुरूस्तीसाठी ६ हजार रूपये तर पूर्णत: नष्ट झालेल्या बोटीसाठी १५ हजार रूपये आणि अंशत: बाधित झालेल्या जाळ्यांसाठी ३ हजार रूपये, पूर्णत: नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी ४ हजार रूपये आणि मत्सबीज शेतीसाठी १० हजार रूपये प्रतिहेक्टरची मदत देण्यात येणार आहे.
मत्स्यसाठ्यासाठी ६० रूपये प्रतिकिलो तलावाचे अपेक्षित मत्स्योत्पादनाच्या ५० टक्के मर्यादित इतका देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येक तलावाचे जलक्षेत्र,अपेक्षित मत्स्योत्पादन याचा विचार करून मस्त्यबीज वाहून गेल्याची आकडेवारी व मत्स्यसाठा वाहून गेल्याची आकडेवारी निश्चित करावी लागणार आहे. मत्स्यसाठयाबाबतची आकडेवारी निश्चित करताना मागील वर्षी तलावाच्या पाण्याची पातळी, तलाव कोरडा असल्यामुळे पाण्याची पातळी,अतिवृष्टी, अवर्षण मुदतवाढ देण्यात आली असल्यास त्याचा आढावा घेण्यात येणार आहे.