Pahalgam Terror Attack | पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून ५० लाखांची मदत जाहीर  file photo
मुंबई

Pahalgam Terror Attack | पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून ५० लाखांची मदत जाहीर

राज्य सरकारचा निर्णय; पुण्यातील जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी

मोहन कारंडे

Pahalgam Terror Attack |

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. राज्य सरकार या कुटुंबांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या गरजांवरही लक्ष केंद्रित करणार आहे.

काश्मीर खोर्‍यातील पहलगाम येथील बैसरन येथे लष्करी गणवेशात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. त्यात २६पर्यटकांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार करत स्वर्गभूमीवर रक्ताचा सडा सांडला होता. हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने ५० लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.

जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी घेणार

त्याचबरोबर, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुणे येथील संतोष जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला सरकारी नोकरी दिली जाईल, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जगदाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. त्यांची आई माणिकबाई, पत्नी प्रगती, मुलगी आसावरी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून त्यांना आधार दिला होता. त्यावेळी घरातला कर्ता गेलाय, मुलीला शासकीय सेवेत घ्या, अशी मागणी कुटुंबीयांनी केली होती.

पाकमधून आलेल्या सिंधी हिंदूंना देश सोडायची गरज नाही

दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात आलेल्या हिंदूंना देश सोडावा लागणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सोमवारी यासंदर्भातील संभ्रम दूर केला आहे. पाकिस्तानातून दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात आलेल्या सिंधी हिंदू लोकांनी यापूर्वीच नागरिकत्वासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे त्यांनी देश सोडण्याची गरज नाही. त्याचवेळी केंद्राच्या आदेशानुसार ज्यांनी भारत सोडायचा आहे, अशा सर्वांची ओळख पटली असून त्यांना देशाबाहेर जाण्यास फर्मावले आहे. संबंधित लोक कोणत्या मागनि बाहेर जात आहेत यावरही लक्ष ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कसा झाला होता हल्ला?

बैसरन हे झेलम नदीच्या खोर्‍यातील सुंदर पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे या हंगामात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. दुपारी पर्यटक काश्मीरच्या स्वर्गीय निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत असताना अचानक लष्करी गणवेशातील दोन दहशतवादी आले आणि त्यांनी प्रथम पर्यटकांची नावे विचारली. त्यानंतर अंदाधुंद गोळीबार करत पळ काढला. मृत आणि जखमीत काही स्थानिक नागरिकांसह गुजरात, ओडिशा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT