मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस File Photo
मुंबई

वेव्हज् परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी 8 हजार कोटींचे करार : मुख्यमंत्री

नवी मुंबईत एज्युकेशन सिटी उभारणार, पनवेलमध्ये चित्रपट सृष्टीसाठी करार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : वांद्रे कुर्ला संकुलातील वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये सुरू असलेल्या जागतिक द़ृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत (वेव्हज्) शुक्रवारी महाराष्ट्राने जवळपास आठ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. यात नवी मुंबई येथे एज्युकेशन सिटी उभारण्याबरोबरच पनवेलमध्ये चित्रपटसृष्टी उभारण्याचाही करार करण्यात आला.

वेव्हज् परिषदेदरम्यान महाराष्ट्र पॅव्हेलियन येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सामंजस्य करारांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, वेव्हज् परिषदेसारख्या एका व्यासपीठाची जागतिक पातळीवर गरज होती. ही गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या वेव्हज् परिषदेचे आयोजन केले आणि त्याचे यजमानपद महाराष्ट्राकडे दिले. राज्यासाठी ही एक मोठी संधी आहे. वेव्हज् परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्त्वाचे सामंजस्य करार केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा, एनएसईने वेव्हज् निर्देशांक सुरू केलेला आहे.

वेव्हज्च्या यशामधला मुकुटमणी

43 कंपन्या, या द़ृकश्राव्य क्षेत्रातल्या आहेत, या कंपन्यांचा निर्देशांक सुरू झालेला आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आणि एकूणच फायनान्शियल इको-सिस्टीम तयार करण्याकरिता हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. हा वेव्हज् इंडेक्स म्हणजे वेव्हज्च्या यशामधला एक मुकुटमणी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या दोन जागतिक विद्यापीठांसोबत सामंजस्य करार केल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत, परदेशी विद्यापीठांना देशामध्ये त्यांचे केंद्र उघडण्याची परवानगी मिळाली आहे. नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्युसिटी उभारण्यात येणार आहे. या एज्युसिटीमध्ये जागतिक दर्जाची 10 ते 12 विद्यापीठे आपले कॅम्पस सुरू करणार आहेत.

त्यातील दोन विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आला. सुरुवातीला दीड हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे; पण भविष्यात ही गुंतवणूक वाढत जाणार आहे. आणखी तीन महत्त्वाच्या विद्यापीठांशी चर्चा सुरू आहे. देशातले जागतिक विद्यापीठ एकत्र असलेले पहिले कॅम्पस नवी मुंबईमध्ये सुरू होत आहे.

फिल्मसिटी अन् चित्रपटसृष्टीही

प्राईम फोकससोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्याच्यामध्ये प्राईम फोकस एक फिल्मसिटी या ठिकाणी तयार करणार आहे, ज्यामध्ये जवळपास 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, किमान 10 हजार लोकांना रोजगार मिळेल. पनवेल येथे चित्रपटसृष्टी उभारण्यासाठी गोदरेजसोबतही दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT