Flats Pudhari File Photo
मुंबई

Illegal Flat Registration Rules: फ्लॅट खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी! अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीला सरकारचा लगाम

फ्लॅट खरेदीतील फसवणूक रोखण्यासाठी नवीन नियम; मंजूर नकाशा, बांधकाम परवानगी आणि आवश्यक प्रमाणपत्रांशिवाय दस्त नोंदणीवर निर्बंध

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अनधिकृत इमारती, झोनिंग न पाहता झालेले बांधकाम आणि बेकायदेशीर फ्लॅट विक्रीला आळा घालण्यासाठी अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी तत्काळ थांबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व दुय्यम निबंधकांना नवीन नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.

मुंबई मेट्रोपॉलिटन विभाग ( एमएमआर ), ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, हवेली, मुळशी, नागपूर यांसह राज्यातील विविध शहरांमधील सबर्बन भागांत रहिवासी झोन नसताना इमारती उभारणे, 'रेरा' नोंदणी न करणे आणि मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त बांधकामाची विक्री करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले होते.

विधानमंडळातही या संदर्भात लोकप्रतिनिधींकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या गैरकारभाराला पायबंद घालण्यासाठी सरकारने ही नियमावली लागू केली आहे.

महारेरा कायद्यानुसार नोंदणी आवश्यक असलेल्या प्रकल्पांतील फ्लॅटच्या पहिल्या विक्रीसाठी नोंदणी प्रमाणपत्र / भोगवटा प्रमाणपत्र आणि मंजूर नकाशा जोडणे बंधनकारक असेल. रेरा नोंदणीची गरज नसलेल्या प्रकल्पांसाठी सक्षम प्राधिकरणाचे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र (सीसी), मंजूर नकाशा, झोन दाखला आणि मोजणी नकाशा सादर करावा लागेल.

मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त बांधकामावर बंदी

दस्तऐवजात नमूद फ्लॅटचे क्षेत्रफळ मंजूर नकाशातील क्षेत्रफळापेक्षा जास्त असल्यास अशा दस्तांची नोंदणी दुय्यम निबंधकांना करता येणार नाही. यूडीसीपीआर, डी.पी. प्लॅन किंवा प्रादेशिक योजनेच्या नियमांचे पालन न केलेल्या अनधिकृत इमारतींमधील फ्लॅटची विक्री करता येणार नाही.

अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार

अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची जाणीवपूर्वक नोंदणी करणाऱ्या दुय्यम निबंधकांवर थेट विभागीय चौकशी सुरू केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सामान्यांची आयुष्यभराची पुंजी अनधिकृत बांधकामांमध्ये गुंतवून त्यांची फसवणूक होण्याचे प्रकार थांबवणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. अनेकदा नागरिक विश्वासाने सदनिका खरेदी करतात, मात्र, नंतर ती अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अशा गैरप्रकारांना कायमचा आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT