मुंबई : राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सामंजस्य करार झाला. या सामंजस्य करारांतर्गत राज्यात मुंबई, पुणे व नागपूर येथे प्रत्येकी एक अशी तीन बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांना सरकारी सेवा जलदगतीने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मायक्रोसॉफ्टचे वेंकट कृष्णन यांनी स्वाक्षर्या केल्या. हा सामंजस्य करार महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देणारा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शासन अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि पारदर्शक होईल, ज्याचा थेट लाभ नागरिकांना मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव नवीन सोना, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले यांच्यासह मायक्रोसॉफ्टचे विक्रम काळे, विशाल घोष आदी उपस्थित होते.
भूगोल-संबंधित प्रगत विश्लेषणासाठी, जी.आय.एस. आणि उपग्रह इमेजरीद्वारे धोरणात्मक निर्णय प्रक्रियेस सहाय्य करण्यासाठी मुंबईत भूगोल विश्लेषण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. हे केंद्र मुख्य सचिव कार्यालयात कार्यरत राहील. उपग्रह इमेजरी विश्लेषण, भू-सांख्यिकी व्यवस्थापन आणि जी.आय.एस.-आधारित वापराच्या माध्यमातून शासनाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेस मोठी मदत होईल. पुणे येथे न्यायवैज्ञानिक संशोधन आणि ‘ए.आय. केंद्र’ स्थापन करण्यात येणार असून गुन्हे तपास आणि न्यायवैज्ञानिक विश्लेषणासाठी ए.आय.चा उपयोग वाढविण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.