File photo
मुंबई

DA Hike | राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

5.16 लाख कर्मचारी, 8.72 लाख निवृत्ती वेतनधारकांना लाभ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य शासकीय आणि अन्य पात्र कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. या निर्णयानुसार, महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्के करण्यात येणार आहे. यासंदर्भात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत निवेदन सादर केले. या निर्णयाचा लाभ राज्यातील 5.16 लाख शासकीय कर्मचारी आणि सुमारे 8.72 लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो कर्मचार्‍यांसाठी दिलासादायक ठरणारा असा हा निर्णय घेतला असून, त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जुलै 2025 पासून मिळणार वाढीव भत्ता

महागाई भत्त्यातील ही वाढ जुलै 2025 पासून लागू करण्यात येणार असून, जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकीची रक्कम मार्च 2026 मध्ये कर्मचार्‍यांना दिली जाणार आहे. राज्य शासनाच्या या संवेदनशील आणि सकारात्मक निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचार्‍यांना आर्थिक बळ मिळून त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. राज्य शासन कर्मचार्‍यांच्या हितासाठी कटिबद्ध असून, राज्यातील सर्व घटकांसोबत राज्य शासनाच्या आर्थिक सुरक्षिततेसही प्राधान्य देत असल्याचे वित्त राज्यमंत्री जयस्वाल यांनी म्हटले आहे.

महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती असून, त्याच प्रकारे ती यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात आणि त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचार्‍यांबाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहायक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा, असे सरकारने शासन निर्णयात नमूद केले आहे.

वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी 2026 पासून रोखीने मिळणार

वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी 2026 पासून रोखीने देण्यात येणार असून, जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकीची रक्कम गुढीपाडव्याच्या निमित्ताने मार्च 2026 मध्ये देण्यात येईल. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकीसंदर्भात आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत, असेही राज्यमंत्री जयस्वाल यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT