Madhuri Elephant
मुंबई : नांदणी मठातील ‘माधुरी’ हत्तीणीला पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार स्वतः सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे नांदणी मठालाही स्वतंत्र याचिका दाखल करण्यास सांगण्यात आले आहे.
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, गणेश नाईक, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, प्रकाश आबिटकर, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, सदाभाऊ खोत, प्रकाश आवाडे तसेच नांदणी मठाचे प्रतिनिधी आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ३४ वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. ती पुन्हा मठात यावी, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठ प्रशासनाने एक याचिका दाखल करावी आणि त्याचवेळी राज्य सरकारही एक याचिका दाखल करेल. दोघांच्या याचिकांमधून सर्वोच्च न्यायालयात स्पष्टपणे मांडणी केली जाईल. राज्य सरकार या हत्तीणीची निगा राखण्यासाठी तयार असल्याचे सांगितले जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून माधुरीची हत्तीणीची निगा राखण्यासाठी पशुवैद्यकीय तज्ज्ञांची एक विशेष टीम नेमली जाणार आहे. तिच्या आहार, आरोग्य आणि देखरेखीची जबाबदारी राज्य सरकार घेणार असल्याचंही जाहीर करण्यात आले आहे.
सध्या माधुरी ही एका रेस्क्यू सेंटरमध्ये आहे. मात्र मठ प्रशासनासह स्थानिक भाविकांची मागणी आहे की तिला पुन्हा मठात परत आणण्यात यावे. या पार्श्वभूमीवर सरकारने आता सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून सर्वोच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे स्थानिक जनता आणि मठ प्रशासनात आणि माधुरीशी भावनिक नातं असलेल्या हजारो भाविकांमध्ये माधुरी परत येण्याची आशा निर्माण झाली आहे.