Maharashtra government 648 crore fund approved
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक जिल्ह्यांतील शेती, घरे, पायाभूत सुविधा आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांना मदतीचा ओघ सुरुच असून राज्य सरकारकडून नुकताच ६४८ कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्य सरकारने या निधीच्या वितरणाला मान्यता दिली असून, विविध महसूल विभागांनुसार संबंधित जिल्ह्यांना निधी वितरित केला जाणार आहे. हा निधी विशेषत: शेतीतील नुकसान भरपाई, घरांची पुनर्बांधणी, रस्ते आणि पूल दुरुस्ती तसेच प्राथमिक सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभाग
बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना निधी वितरित करण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
नागपूर विभाग
नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरामुळे रस्ते वाहतुकीसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या भागांना आवश्यक मदत तातडीने पोहोचविण्यासाठी निधी वितरित केला जाईल.
नाशिक विभाग
नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यांनाही निधीचा लाभ मिळणार आहे. या भागात पिकांच्या नुकसानीबरोबरच काही ठिकाणी घरांचेही नुकसान झाले आहे.
अमरावती विभाग
अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांनाही मदतीचा निधी मिळणार आहे. या भागात शेती तसेच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी निधीचा वापर केला जाणार आहे.
पुणे विभाग
सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना निधी वाटप करण्यात आले आहे. विशेषत: सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या भागात पाण्याने केलेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ही मदत उपयुक्त ठरणार आहे.
कोकण विभाग
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही मदतीचा निधी देण्यात आला असून, पावसामुळे बाधित झालेल्या किनारपट्टी भागांतील नागरिकांना आवश्यक सहाय्य मिळेल.
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, हा निधी तातडीने वितरित करून बाधित नागरिकांना मदत पोहोचविणे, शेतीतील नुकसानाची भरपाई आणि सामान्य जनजीवन सुरळीत करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. तसेच जिल्हा प्रशासनाला निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.