Maharashtra FDA Hotel inspections Pudhari
मुंबई

New Year Celebration | नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, आस्थापनांची सखोल तपासणी होणार

Narhari Zirwal | अन्न व औषध प्रशासन सतर्क, मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra FDA Hotel inspections

मुंबई: नववर्षाचे आगमन आणि ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, उपहारगृहे व आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ असणे आवश्यक आहे. यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांची सखोल तपासणी करतील, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेलमधील स्वच्छतेला विशेष महत्त्व असून यासंदर्भात हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करावे. तपासणीदरम्यान मुदतबाह्य कच्च्या मालाचा वापर, अन्नपदार्थांमध्ये खाद्य व अखाद्य रंगांचा वापर, तसेच स्वच्छतेच्या निकषांचे पालन होत आहे की नाही, याची काटेकोर तपासणी केली जाईल. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर मोठी मोहीम हाती घेतली असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

‘स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ उपक्रम: उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार व प्रोत्साहन

उत्तम स्वच्छता व अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावरील पुरस्कार २६ जानेवारी २०२६ रोजी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील, तर राज्यस्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या हॉटेल्सचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

मंत्री झिरवाळ यांच्या संकल्पनेतून ‘स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ हा विशेष उपक्रम २६ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा सविस्तर अहवाल मंत्री कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जेजुरी येथील भंडाऱ्याचा 2200 किलोचा साठा जप्त

जेजुरी नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर विजयोत्सवाच्या वेळी भंडाऱ्याचा भडाका उडाल्याने मोठी दुर्घटना घडली होती. सदर आगीचा थेट भंडाऱ्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी औषध निरीक्षक व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. यावेळी प्लेन पिशव्यांमध्ये साठवलेला २,२०० किलो भंडाऱ्याचा साठा जप्त करण्यात आला असून त्यामध्ये हळद आढळून आली आहे. सदर साठा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT