FDA drug store inspection pudhari photo
मुंबई

FDA drug store inspection : एफडीएचा मोर्चा आता औषधांच्या दुकानांकडे

औषध क्षेत्राशी संबंधित ३०० तक्रारी; १०० हून अधिक औषध आस्थापनांची तपासणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : औषधांच्या दुकानांमध्ये पात्र फार्मासिस्टची उपस्थिती, औषधांची योग्य साठवणूक तसेच आवश्यक तापमानाची पूर्तता होत आहे की नाही, याची अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) तपासणी केली जात आहे. औषध क्षेत्राशी संबंधित सुमारे ३०० तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यातील बहुतांश तक्रारींची तपासणी करण्यात आल्याची माहिती एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित वार्तालाप कार्यक्रमात मुंढे यांनी औषध क्षेत्रातील नियमांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. काही औषधांसाठी विशिष्ट तापमान आणि नियंत्रित वातावरणात साठवणूक आवश्यक असते. त्यामुळे औषधांची साठवणूक नियमांनुसार होत आहे का, याकडे एफडीएकडून विशेष लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

औषधांची अर्धी किंवा वेगळी मात्रा विकणे, फार्मसीकडून नियमबाह्य जाहिराती करणे यांसारख्या बाबींवरही एफडीएची नजर आहे. अशा प्रकारचे नियमभंग आढळल्यास नागरिकांनी एफडीएच्या तक्रार पोर्टलवर माहिती द्यावी, असे आवाहन मुंढे यांनी केले.

जुलैअखेरपर्यंत अन्न क्षेत्रातील तीन हजारांहून अधिक खाद्य व्यवसायांची तपासणी करण्यात आली असून, औषध क्षेत्रातील १०० हून अधिक आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जात असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

लॅब एफडीएच्या अखत्यारीत नाही

डायग्नोस्टिक लॅबोरेटरीजचे नियमन सध्या एफडीएच्या अखत्यारीत नसल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

रक्तपेढ्यांवरही कडक नजर

रक्तपेढ्यांच्या अनुपालनाबाबत व्यापक आदेश जारी करण्यात आला असून, सर्व परवानाधारक रक्तपेढ्यांनी संबंधित नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. रक्तदान शिबिर केवळ परवानाधारक संस्थेलाच आयोजित करता येणार आहे. शिबिरात आवश्यक वैद्यकीय व पॅरामेडिकल कर्मचारी, रक्ताची योग्य वाहतूक आणि संपूर्ण कोल्ड-चेन व्यवस्था असणे आवश्यक आहे. संकलित रक्ताची माहिती संबंधित प्राधिकरणाला देणे बंधनकारक आहे. रक्तदानाच्या बदल्यात कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करता येणार नाही. पैसे घेऊन रक्तदान किंवा रक्तविक्रीला परवानगी नसल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. नियमभंग आढळल्यास कारवाई करण्यात येणार असून, रक्तपेढ्यांची तपासणी आणखी वाढवण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT