मुंबई: अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) गेल्या दोन दिवसांत राज्यभरात खाद्यतेल आणि मसाल्यांच्या साठ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. सुमारे २८ हजार क्विंटल खाद्यतेल आणि १८ ते २० हजार क्विंटल मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
ही राज्यातील अशा प्रकारची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळनेर शिवारात एफडीएने टाकलेल्या छाप्यात १ कोटी रुपयांचा मसाला जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, कारवाईच्या भीतीने उत्पादकांनी सुमारे २ कोटी रुपयांचा मसाला माळरानात फेकल्याची माहिती समोर आली आहे.
नागरिकांना तक्रारी करण्याचे आवाहन
भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आढळल्यास नागरिकांनी एफडीएकडे तक्रार करावी, असे आवाहन आयुक्त मुंढे यांनी केले आहे. यासाठी एफडीएच्या ऑनलाईन तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवता येते.
दिवाळीपुरतीच नव्हे, तर वर्षभरातील प्रमुख सणांच्या काळात अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.