FDA Raid Pudhari
मुंबई

Maharashtra FDA Action: औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांवर FDAचा दणका; ८८० परवान्यांवर कारवाई

८८० आस्थापनांवर परवान्यांबाबत कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: औषधांची गुणवत्ता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या औषध उत्पादक, विक्रेते, रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला.

जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत औषध विभागाने २ हजार ९०२ आस्थापनांची तपासणी केली. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ८८० आस्थापनांवर परवान्यांबाबत कारवाई करण्यात आली. यामध्ये ६७७ परवाने निलंबित, तर २०३ परवाने रद्द करण्यात आले.

गंभीर प्रकरणांत १०४ ठिकाणी शोध व जप्तीची कारवाई करून ११ कोटी ४१ लाख रुपये किमतीचा बेकायदेशीर औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणांत २० गुन्हे दाखल करून २१ जणांना अटक करण्यात आली.

औषध उत्पादन आस्थापनांच्या ६०७, तर औषध विक्री आस्थापनांच्या २ हजार २९५ तपासण्या करण्यात आल्या. उत्पादन क्षेत्रातील १४० आणि विक्री क्षेत्रातील ७४० आस्थापनांवर कारवाई झाली.

औषध निर्मितीतही नियमभंग

औषध उत्पादक आस्थापनांमध्ये सक्षम तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव, मंजुरी नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून उत्पादन नोंदी करणे, सक्षम तज्ज्ञाच्या अनुपस्थितीत गुणवत्ता तपासणी करणे, वार्षिक उत्पादन गुणवत्ता आढावा तयार न करणे, उत्पादनाच्या नोंदी आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये तफावत आढळणे अशा त्रुटी समोर आल्या.

काही आस्थापनांमध्ये निकृष्ट दर्जाची औषधे तयार करणे तसेच परवान्यात मंजूर नसलेल्या औषधांचे उत्पादन केल्याचेही निदर्शनास आले.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री

औषध विक्री केंद्रांमध्ये नोंदणीकृत औषध विक्रेत्याच्या प्रत्यक्ष देखरेखीशिवाय औषध विक्री, विना बिल खरेदी-विक्री, विक्री पावतीवर औषधाचा तुकडा क्रमांक आणि मुदत संपण्याची तारीख नमूद न करणे, अनुसूची एच-१ नोंदवही अद्ययावत न ठेवणे आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अनुसूचित औषधांची विक्री अशी उल्लंघने आढळली.

इन्सुलिन, लस आणि तापमान संवेदनशील औषधे आवश्यक तापमानात न ठेवणे, मुदत संपलेली औषधे विक्रीसाठी उपलब्ध ठेवणे, तसेच अमली व अमलीसदृश औषधांच्या प्रत्यक्ष साठ्यात आणि नोंदवहीतील साठ्यात तफावत आढळल्याचेही प्रशासनाने सांगितले.

तक्रारींच्या चौकशीत मोठी वाढ

जून ते ऑगस्ट २०२६ या तीन महिन्यांत औषध विभागाकडे १ हजार ३९७ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ९२४ तक्रारींची चौकशी करण्यात आली. मागील वर्षाच्या तिमाही सरासरीच्या तुलनेत तक्रारी प्राप्त होण्यात ५५७ टक्के, तक्रारींच्या चौकशीत ३७८ टक्के, शोध व जप्तीच्या कारवायांत २१७ टक्के आणि जप्त मालाच्या किमतीत २३४ टक्के वाढ झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईतही २१ टक्के वाढ झाली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई सुरूच राहील,” असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

रक्तपेढ्यांमध्ये गंभीर त्रुटी

रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांच्या तपासणीत नोंदणीकृत रक्त संक्रमण अधिकारी नियुक्त नसणे किंवा त्यांच्या अनुपस्थितीत रक्त संक्रमण अथवा वितरण करणे, रक्ताच्या तपासणी व वितरणाच्या नोंदवह्या अद्ययावत नसणे, नोंदींवर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नसणे, रक्तघटकांचा मागोवा ठेवण्यात त्रुटी आणि कार्यपद्धतीचे पालन न करणे अशा गंभीर बाबी आढळल्या.

रक्त साठवणुकीच्या तापमानाबाबतही नियमांचे उल्लंघन आढळले. काही ठिकाणी शीतगृहाचे तापमान निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त होते किंवा तापमान वाढल्यास सूचना देणारी यंत्रणा बंद होती. मुदत संपलेल्या आणि दूषित रक्ताच्या पिशव्या योग्य चिन्हांकनाशिवाय ठेवण्यात आल्याचेही आढळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT