मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या अवास्तव अपेक्षा आणि ‘पॉप्युलर’ शाखांवरचा अट्टाहास यंदाही प्रकर्षाने पुढे आला आहे. यंदा प्रवेश प्रक्रियेत सुधारित ‘ऑटोफ्रिज’ नियम लागू करूनही 5 हजार 762 विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता शेवटच्या संस्थास्तर फेरीत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यंदा नियमांमध्ये बदल करून प्रवेश प्रक्रियेतील लांबणीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार, पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीचे, दुसर्या फेरीत पहिल्या तीन पसंतीतील आणि तिसर्या फेरीत पहिल्या सहा पसंतीतील महाविद्यालय अलॉट झाल्यास जागा ‘ऑटोफ्रिज’ होणार होती. म्हणजेच विद्यार्थ्यांनी तिथे प्रवेश घेणे अनिवार्य होते. मात्र, प्रत्यक्षात हा नियम फारसा प्रभावी ठरला नाही.
39 हजार 403 विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 762 विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश टाळल्याचे दिसून आले. पण पहिल्या फेरीत जागा अलॉट झालेल्या 1 लाख 44 हजार 776 पैकी फक्त 15 हजार 852 विद्यार्थ्यांनाच पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट झाले. दुसर्या फेरीत एकूण अलॉट झालेल्या 1 लाख 29 हजार 577 पैकी 13 हजार 865 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पहिल्या तीनापैकी एका महाविद्यालयात प्रवेश मिळाला.
तिसर्या फेरीत 98 हजार 055 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट झाले. त्यापैकी 9 हजार 706 विद्यार्थ्यांनी पहिल्या सहा प्राधान्यक्रमांमध्ये अचूक महाविद्यालय दिले होते. महाविद्यालय अलॉट झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जेमतेम 10 टक्के किंवा त्या पेक्षा कमी विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या सर्वात आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही म्हणून त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेशही आतापर्यंत खूप कमी झाले आहेत. परिणामी, आता मुक्त फेरीत विद्यार्थ्यांना मिळेल त्या महाविद्यालयातील प्रवेश घ्यावे लागणार आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी बॅटरमेंट संधी ठेवली आहे, या चौथ्या फेरीत त्यापेक्षा दुय्यम दर्जाचे महाविद्यालय मिळाले तर आता त्या जागेवर प्रवेश घ्यावा लागणार आहे. अनेकांना कमी पर्सेंटाइल गुण असूनही कम्प्युटर सायन्स, आयटी, तसेच नव्याने लोकप्रिय झालेल्या एआय-एमएलसारख्या अभ्यासक्रमासाठी आणि तोही नामवंत महाविद्यालयात प्रवेश हवा असतो अनेकदा सातव्या-आठव्या पसंतीच्या महाविद्यालयात जागा मिळूनही विद्यार्थी ती नाकारतात. पालकही या अट्टहासाला पाठिंबा देतात, यामुळे प्रक्रियेत गोंधळ वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सीईटी कक्षाचे अधिकारी म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरताना वास्तववादी विचार करणे आवश्यक आहे. लोकप्रिय महाविद्यालये आणि शाखा निवडण्याचा दुराग्रह करून प्रक्रिया लांबवली जाते. यामुळे शेवटी मुक्त फेरीत मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. प्रवेश मिळूनही पहिल्या तीन फेरीत प्रवेश न केल्यामुळे आता ही चिंता अनेकांना लागून राहिले आहे.
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी आता चौथी फेरी सुरु झाली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पर्याय भरण्याची संधी 30 ऑगस्टपर्यंत आहे. या फेरीचे अलॉटमेंट 1 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. ज्यांना या राऊंडमध्ये प्रथमच जागा मिळेल अशा पात्र विद्यार्थ्यांनी 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान लॉगिनद्वारे अलॉटमेंट ‘सेल्फ-व्हेरिफाय’ करून जागा स्वीकारणे आवश्यक आहे.
फेरीनिहाय चित्र
पहिल्या फेरीत 1,44,776 विद्यार्थ्यांपैकी 15,852 जणांना पहिली पसंती मिळाली; त्यापैकी 562 जणांनी प्रवेश नाकारला.
दुसर्या फेरीत 1,29,577 पैकी 13,865 विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतींपैकी एक महाविद्यालय मिळाले; 3201 जणांनी प्रवेश घेतला नाही.
तिसर्या फेरीत 98,055 विद्यार्थ्यांपैकी 9706 जणांना पहिल्या सहा पसंतींपैकी महाविद्यालय मिळाले; त्यापैकी 1999 जणांनी नकार दिला.