मुंबई : ऊर्जा, शहरी आणि ग्रामीण भागांतील पायाभूत सुविधा प्रकल्प आणि रस्ते-महामार्ग निर्मितीत केलेली गुंतवणूक, तसेच इलेक्ट्रिक वाहन, सेमीकंडक्टर निर्मितीला प्रोत्साहन अशा विविध कारणांमुळे येत्या पाच वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरची होणार आहे. तसेच, सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या तुलनेत महाराष्ट्रावरील कर्जाचे प्रमाण देशात सर्वात कमी असून, वित्तीय शिस्तीच्या बाबतीतही महाराष्ट्र देशातील अव्वल असल्याचे निरीक्षण ‘मॉर्गन स्टँली’ या जागतिक आर्थिक विश्लेषण संस्थेच्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील शिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांनी तरुणांना रोजगारक्षम बनवले आहे. ‘मॉर्गन स्टँली’ने राज्याच्या सक्षम नेतृत्व आणि वित्तीय शिस्तीचे कौतुक केले असून, भारतातील सर्वात कमी कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर राखल्याबद्दल प्रशंसा केली आहे. महाराष्ट्राने रस्ते, मेट्रो, विमानतळ आणि बंदरांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. या पायाभूत सुविधांनी महाराष्ट्राला जागतिक व्यापार केंद्र म्हणून बळकटी दिली आहे. त्याने थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ आणखी वाढणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई आणि पुणे ही देशातील प्रमुख आयटी हब म्हणून उदयास आली आहेत. माहिती-तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, बँकिंग, वित्त, विमा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. डिजिटल पेमेंटस् आणि स्टार्टअप्सच्या वाढत्या वापरामुळे महाराष्ट्र डिजिटल अर्थव्यवस्थेत आघाडीवर आहे. याला ‘मॉर्गन स्टँली’ने आर्थिक परिवर्तनाचा आधारस्तंभ संबोधले आहे.
जागतिक स्तरावरील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित संशोधन संस्था ‘मॉर्गन स्टँली’ने आपल्या नवीन अहवालात महाराष्ट्राला आर्थिक क्षेत्रातील सर्व प्रमुख निर्देशांकांवर अव्वल स्थान दिले आहे. या अहवालात महाराष्ट्राच्या धोरण आणि प्रगतीचा गौरव करण्यात आला आहे. ‘मॉर्गन स्टँली’ने आमच्या राज्यावर आणि नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.