मुंबई: दंत उपचारांसाठी वापरण्यात येणारी उपकरणे, साहित्य यांच्या निर्मितीपासून विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वचा निर्णय घेतला. दंत प्रयोगशाळा, दंत साहित्याचे उत्पादक, विक्रेते आणि वितरक यांच्यासाठी औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा तसेच वैद्यकीय उपकरण नियमांनुसार परवाना आणि नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय ६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला.
या निर्णयानुसार दातांची कवळी, क्राऊन, ब्रिज, दंत रोपणासाठी लागणारी उपकरणे तसेच अन्य दंत उपकरणे तयार करण्यासाठी दंतवैद्यांची लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक सूचना आवश्यक असेल. दंत तंत्रज्ञांना रुग्णांकडून काम स्वीकारता येणार नाही. तसेच निदान, उपचाराचे नियोजन किंवा उपचार प्रक्रियेत हस्तक्षेप करता येणार नाही.
दंत साहित्याचे उत्पादक, विक्रेते आणि वितरकांना नियमानुसार परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक असेल. विक्रेत्यांनी राज्य परवाना प्राधिकरणाकडून नोंदणी करून घ्यावी. दंतवैद्यांनीही साहित्य खरेदी करताना परवाना क्रमांक, उत्पादकाचे नाव, बॅच क्रमांक आणि उत्पादन व मुदत समाप्तीची तारीख तपासावी.
विनापरवाना, मुदतबाह्य किंवा संशयास्पद साहित्याचा वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दंत प्रयोगशाळांना कच्चा माल, पुरवठादार, दंतवैद्यांच्या सूचना, गुणवत्ता तपासणी आणि उपकरणांच्या वितरणाची नोंद ठेवावी लागेल.
तसेच दंत प्रयोगशाळेतील काम केवळ मान्यताप्राप्त शैक्षणिक पात्रता आणि वैध नोंदणी असलेल्या दंत तंत्रज्ञांकडूनच करून घेणे बंधनकारक असेल.