मुंबई डेंग्यूची राजधानी pudhari photo
मुंबई

Dengue virus cases : मुंबई डेंग्यूची राजधानी

सहा महिन्यांत 2031 जणांना डंख! मुंबईत सर्वाधिक 395 रुग्ण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच राज्याला डेंग्यूच्या आजाराने विळखा घातला आहे. शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने राज्याच्या आरोग्य विभागाची झोपच उडाली आहे. डेंग्यूचा डंख वाढल्याने पालिका प्रशासनही सतर्क झाले आहे. यंदा जानेवारीपासून 16 जून 2025 दरम्यान डेंग्यूचे 2031 रुग्ण आढळले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीची ही रुग्णसंख्या चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाचेही म्हणणे आहे.

राज्यात डासाचा डंख सुरूच असून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, यावर्षी जानेवारी ते 16 जून 2025 दरम्यान 2031 रुग्ण आढळले. परंतु सुदैवाने अद्याप एकही मृत्यू नाही. गेल्या पाच वर्षांत डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण गेल्यावर्षी 2024 मध्ये आढळून आले असून तो आकडा 19 हजारांहून अधिक होता. मात्र यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच साथ वाढत आहे. कोरोनाच्या कालावधीत डेंग्यूची रुग्णसंख्या कमी झालेली होती.

डेंग्यू हा सर्वांत मोठ्या प्रमाणावर डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हवामान बदल, जलद शहरीकरण आणि लोकसंख्यावाढीमुळे तो वेगाने पसरत आहे. प्रादुर्भाव हा सहसा हंगामी असतो. पावसाळ्यात आणि नंतरच्या काळात रुग्णसंख्या वाढत असते. जागतिक आरोग्य संघटनेने डेंग्यूला सार्वजनिक आरोग्यासाठी असलेल्या टॉप टेन धोक्यांपैकी एक म्हणून वर्गीकृत केले आहे .

डेंग्यूची वेगळी अशी लक्षणे नसतात. ती फ्लूसारखी गंभीर असतात. थोड्या प्रमाणात लोकांमध्ये गंभीर डेंग्यू होतो. जो प्राणघातक ठरू शकतो. डेंग्यूचे चार विषाणू आहेत, ज्यांना डेंग्यू सेरोटाइप म्हणतात. संसर्गातून बरे होण्यामुळे डेंग्यूच्या त्याच सीरोटाइपपासून प्रतिकारशक्ती मिळते, तरीही लोकांना नंतर वेगळ्या सीरोटाइपने संसर्ग झाल्यास गंभीर डेंग्यूचा धोकाही वाढतो.

अशी वाढते डासांची उत्पत्ती

80 टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणार्‍या ‘एडीस इजिप्टाय’ डासांची उत्पत्तीस्थाने आढळून येतात. डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणार्‍या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डेंग्यू विषाणूवाहक डासांच्या अळ्या प्राधान्याने पाण्याचे पिंप, फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्ट्स, मनीप्लँट्सारखी शोभिवंत झाडे, घराच्या गॅलरीमध्ये किंवा झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणार्‍या प्लेट्स, वातानुकूलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे याठिकाणी डासांची उत्पत्ती आढळून आली आहे.

सर्वाधिक रुग्ण मुंबईत

महापालिका क्षेत्रात मुंबईमध्ये डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक आहेत. 2023 मध्ये राज्यात 17 हजार डेंग्यूच्या रुग्णांपैकी मुंबईत 4 हजार 300 हून अधिक रुग्ण आढळले, तर 2024 मध्येही 19 हजार रुग्णांपैकी मुंबईत 5 हजार 852 रुग्ण आढळले, तर यावर्षी 2 हजार रुग्णांपैकी 395 रुग्ण मुंबईत आहेत.

डासांच्या प्रत्येक उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणी एकावेळी एक मादी डास 100 ते 150 अंडी घालते. एका मादी डासाचे सरासरी आयुर्मान हे 3 आठवड्यांचे असते. या तीन आठवड्यांच्या कालावधीत मादी डास किमान 4 वेळा साचलेल्या पाण्यात अंडी घालते. म्हणजेच एका मादी डासामुळे साधारणपणे 400 ते 600 डास तयार होत असतात. हे डास मलेरिया, डेंग्यू- सारख्या आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.

पावसाळ्यात दरवर्षी रुग्णसंख्या वाढत असते. यावर्षीही डेंग्यूचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. नागरिकांनी आठवड्यातून एकदा आपल्या भोवतालचा परिसर स्वच्छ करावा. पाणी साचले असल्यास पाणी वाहते करावे. डासापासून बचाव करण्यासाठी लांब हाताचे कपडे, मच्छरदाणी, डास नियंत्रण आधुनिक यंत्राचा वापर करावा. लोशन लावण्याबरोबरच ताप, अंगदुखी, डोकेदुखी असल्यास त्वरित सरकारी दवाखान्यात तपासणी करून घ्यावी.
डॉ. मधुकर गायकवाड,जे. जे. रुग्णालयातील मेडिसीन विभागाचे प्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT