दिल्‍ली येथे काँग्रेस कार्यसमितीची बैठक  File Photo
मुंबई

महाराष्ट्रातील पराभवाचे खापर राज्य नेतृत्वावरः काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत ५ तास मंथन

Maharashtra Election Result | निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यसमितीची बैठक पार पडली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह पक्षाची रणनिती आणि इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यसमितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. जवळपास पाच तास ही बैठक चालली.

विधानसभा निवडणुकीत झालेली कामगिरी पाहता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांनी आगामी काळात मोठ्या बदलांविषयी सूचक वक्तव्य केले. पक्ष संघटनेत अपेक्षित बदल, ईव्हीएमवरील भूमिका अशा काही विषयांवरचे प्रस्ताव या बैठकीत पारीत करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्रातील पराभवाचे खापर राज्य नेतृत्वावर फोडल्याचे समजते.

महाराष्ट्रात मोठे संघटनात्मक बदल आणि दिल्ली विधानसभा स्वबळावर लढणार

महाराष्ट्रात मोठ्या संघटनात्मक बदलांचे संकेत आजच्या बैठकीतून देण्यात आले. अगदी स्थानिक पातळीपासून ते संघटनेतील सर्वात मोठ्या पदापर्यंत हे फेरबदल केले जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेश पातळीसह जिल्हा, तालुका आणि त्याखालील सर्व पातळीवर बदल केले जाण्याची शक्यता आहे. सोबतच काँग्रेस पक्षाच्या सर्व शाखा महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस यामध्येही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे काँग्रेसला नवे प्रदेशाध्यक्षही लवकरच मिळण्याची शक्यता आहे. तसेच फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक होत आहे. इंडिया आघाडीत घटक पक्ष असलेला आम आदमी पक्ष दिल्लीत सत्तेत आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका काय असणार, यावरही या बैठकीत चर्चा झाली. दिल्ली विधानसभा एकट्याने लढायची, असा निर्णय काँग्रेसने घेतल्याचे समजते.

२६ डिसेंबरला काँग्रेसच्या विस्तारित कार्यसमितीची बैठक कर्नाटकातील बेळगावमध्ये होणार आहे. २६ डिसेंबर १९२४ ला, म्हणजे १०० वर्षांपूर्वी महात्मा गांधी बेळगावमध्ये झालेल्या बैठकीतच काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. या घटनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. या औचित्यावर ही बैठक बेळगाव मध्ये होणार आहे.

काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीनंतर कार्यसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, भविष्यात काय केले पाहिजे यावर व्यापक चर्चा बैठकीत झाली. काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत ते अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात येतील. राज्यात आम्ही एकमताने निवडणूक लढलो, पक्षातील नेत्यांमध्ये कुठलाही वाद नव्हता. पुढील धोरण ठरवण्याबाबत चर्चा झाली. भाजप निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब करते. राज्यातील निवडणूक पार पडल्यानंतर मतदानासंदर्भात येत असलेली आकडेवारी ही संशयास्पद आहे, त्यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. ७५ लाख एवढे मोठे मतदान वाढते, हे आश्चर्य आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसने यापूर्वीही निवडणूक आयोगाकडे काही मुद्द्यांसंदर्भात आपले म्हणणे सादर केले होते. सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी झाली पाहिजे, अशीही काँग्रेसने मागणी केली होती. मात्र काँग्रेसचे यामधून समाधान झालेले नाही. त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जाव्यात, असाही एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे.

काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत सुरुवातीच्या भाषणात खर्गे यांनी निवडणूक आयोग आपले संवैधानिक कर्तव्य बजावत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. विशेषकरून महाराष्ट्रामध्ये मतदानाची वाढलेली टक्केवारी, हा चर्चेचा विषय होता. जातीयवादी शक्तींना पराभुत करून निवडणुका जिंकणे आणि शांतता, प्रगती, बंधुता आणि सौहार्द प्रस्थापित करणे पक्षासाठी महत्त्वाचे आहे, भाजप सरकार वारंवार लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. मणिपूर आणि संभलमधील हिंसाचाराचा संदर्भ देत देशासमोर अनेक संवेदनशील आणि गंभीर समस्या आहेत. दरम्यान, काँग्रेस पक्षाने यापूर्वीही अनेक आव्हानांचा सामना केला आहे. येणाऱ्या काळातही सर्व आव्हानांना तोंड देत पुढे जाऊ आणि काळानुसार बदल घडवून आणू असा विश्वासही मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्‍त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT