मुंबई: राज्यभरातील सर्व धरणांतील एकूण पाणीसाठा ६४.१७ टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २६.३७ टक्क्यांची तूट असल्याने पुढील सहा महिने काटेकोर पद्धतीने पाणीवापराचे नियोजन करावे लागणार आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व धरण प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ३३,८२८.७३ दशलक्ष घनमीटरपर्यंत मर्यादित झाला आहे. सर्वांत कमी पाणीसाठा हा छत्रपती संभाजीनगर विभागात असून, येथील धरणात ३६.७५ टक्के उपयुक्त पाणी उरले आहे.
राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील एकूण ३ हजार ४२ धरणांमध्ये १५ नोव्हेंबरपर्यंत ६४.१७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच दिवशी हा साठा ९०.५४ टक्के इतका होता. त्यामुळे यंदा २६.३७ टक्के कमी पाणीसाठा उपलब्ध आहे.
जलसंपदा विभागाच्या १५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या अहवालानुसार, राज्यातील सर्व धरणांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ४१ हजार ९.६६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यापैकी सध्या २६ हजार ३१६.२१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे; तर एकूण पाणीसाठा ३३ हजार ८२८.७४ दशलक्ष घनमीटरपर्यंत मर्यादित झाला आहे.
राज्यातील सर्व सहा महसुली विभागांपैकी छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी पाणीसाठा आहे. इथे केवळ ३६.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्यावर्षी ८९.४१ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीप्रश्न येत्या काळात उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. पाठोपाठ अमरावती विभागात ५२.२७ टक्के, नागपूर विभागात ५६.०२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक विभागात ७४.०५ टक्के पाणीसाठा आहे.
पुणे विभागात ७४.८२ टक्के पाणीसाठा
पुणे विभागातील पाणीसाठा ७४.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कोकण विभागातील पाणीसाठा ८१.६९ टक्के इतका आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील १३८ मोठ्या धरणांत ७१.२३ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून २६६ मध्यम धरणांतील पाणीसाठ्याचे प्रमाण ५७.२७ टक्के आहे तर २ हजार ६३८ लघु धरण प्रकल्पांत केवळ ३७.४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वच विभागातील पाणीसाठ्यातील घट चिंतेची बाब बनली आहे.