Cyber Investigation Pudhari
मुंबई

Cyber Investigation: सीजीपी आंदोलनात सोशल मीडियावरून दिशाभूल, ५०० प्रोफाइल रडारवर; महाराष्ट्र सायबरचा खुलासा

पाकिस्तानसह परदेशातील १०० खाती सक्रिय, १४० पोस्ट उघड

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: सीजीपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून राबविण्यात आलेल्या खोटी माहिती देणे आणि दिशाभूल मोहिमेचा महाराष्ट्र सायबरने पर्दाफाश केला आहे. राज्यभरात सुरू असलेल्या तपासादरम्यान ५०० हून अधिक सोशल मीडिया प्रोफाइल संशयाच्या कक्षेत आली असून, त्यापैकी सुमारे १०० खाती पाकिस्तान आणि काही मध्य-पूर्वेतील देशांसह भारताबाहेरून कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

महाराष्ट्र सायबरने सीजीपी आंदोलनादरम्यान सोशल मीडियावरील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत ओपन सोर्स इंटेलिजन्स, मेटाडेटा विश्लेषण, वर्तन विश्लेषण आणि एआय -डीपफेक फॉरेन्सिक तपास केला.

या तपासात जनमत प्रभावित करणे आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडविण्याच्या उद्देशाने समन्वित पद्धतीने खोटी माहिती पसरविण्यात आल्याचे आढळून आले.

काही व्हिडीओंमध्ये कृत्रिमरीत्या गर्दी वाढवून दाखविणे, क्लोन केलेले आवाज, सिंथेटिक ऑडिओ आणि सार्वजनिक व्यक्तींना लक्ष्य करणारे फेरफार केलेले व्हिडीओ वापरण्यात आल्याचे उघड झाले. एका नमुन्यात ऑडिओमध्ये १०० टक्के खात्रीने कृत्रिम फेरफार, तर व्हिडीओमध्ये सुमारे ८२ टक्के फेरफार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

महाराष्ट्र सायबरने नागरिकांना सोशल मीडियावरील कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत सरकारी स्रोत आणि विश्वासार्ह वृत्तसंस्थांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिशाभूल, डीपफेक आणि अन्य बेकायदेशीर डिजिटल सामग्री प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही महाराष्ट्र सायबरने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT