मुंबई: मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालय नामांतराच्या प्रस्तावावरून मंगळवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. अखेरीस ब्रिटिशकाळात हजारो भारतीयांच्या मृत्यूला जबाबदार असलेला किंग एडवर्ड हा कसाबसारखा माणूस होता.
देशाची संपत्तीही त्याने लुटून नेली. त्यामुळे परळ येथील केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा प्रस्ताव आम्ही दिला असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
आमदार मिलिंद नार्वेकर म्हणाले, मुंबईत प्लेगची भीषण साथ आली होती, तेव्हा किंग एडवर्ड यांनी दिलेल्या निधीतून या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. मग किंग एडवर्ड या व्यक्तीवर सरकारचा इतका राग का आहे? ते काही अतिरेकी नव्हते.
नामांतर करण्याचा आटापिटा नेमका कशासाठी सुरू आहे? त्यावर लोढा म्हणाले, ब्रिटिश सत्ताकाळ हा भारताच्या शोषणाचा काळ होता. किंग एडवर्ड हा भारतासाठी गौरवाचा विषय नसून, तो गुलामगिरीच्या काळाचे प्रतीक आहे. किंग एडवर्डने भारताला गुलाम केले होते. त्याने रुग्णालयासाठी पैसे दिले, ही दिशाभूल करणारी बाब आहे.
लाखो भारतीयांच्या मृत्यूला एडवर्ड जबाबदार माणूस होता. त्यामुळे त्याच्या नावाचे समर्थन करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. या रुग्णालयाच्या नामांतरासाठी आम्ही तीन नावांचे पर्याय दिले असून सरकार त्याबाबत योग्य निर्णय घेईल. सुचवलेल्या तिन्ही नावांच्या पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडल्यास त्या नावाचे संक्षिप्त रूप हे केईएम हेच असेल, असेही लोढा यांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी ट्रम्प टॉवरचे नाव बदलण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर लोढा म्हणाले, ट्रम्पचे नाव हे केवळ व्यावसायिक भागीदारीमुळे देण्यात आले असून त्याचा कोणत्याही प्रकारच्या गौरवाशी संबंध नाही. दरम्यान, ठाकरे गटाचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी लोढा यांच्या व्यवसायावर प्रश्न उपस्थित केला असता प्रत्युत्तर देताना लोढा यांनी पलटवर केला.
ते म्हणाले, माझा व्यवसाय संपूर्ण जगाला माहित आहे. उत्पन्नाचा स्रोतही ज्ञात आहे. मात्र, तुमचा व्यवसाय काय आहे हे आम्हाला माहिती नाही. तरीही तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या गाडीतून फिरता.
नार्वेकरांनी एक फोन केला असता तरी प्रश्न मिटला असता : सामंत
आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नार्वेकर यांचे चांगले संबंध आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही उत्तम सलोखा आहे. केईएमबाबतचा त्यांनी सभागृहात प्रश्न विचारण्याऐवजी थेट फोनवर संवाद साधला असता किंवा कालसारखे एखादे सुंदर ट्वीट केले असते, तरी हा प्रश्न सुटला असता.