CM Devendra Fadnavis pudhari photo
मुंबई

CMRF Maharashtra: रुग्णांच्या नातेवाईकांच्या व्यवस्थेसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार; सीएमआरएफच्या वेबसाईटवर सर्व तपशील उपलब्ध

रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यामध्ये 'त्रिपक्षीय सामंजस्य करार' करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी आणि त्यांना अधिक चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यामध्ये 'त्रिपक्षीय सामंजस्य करार' करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यासाठी सीएमआरएफच्या वेबसाईटवर सर्व तपशील उपलब्ध असून संबंधित सर्व संस्थांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

मोठ्या रुग्णालयांमध्ये दररोज हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येत असतात. बऱ्याचदा उपचाराचा मोठा खर्च, राहण्याची आणि जेवणाची सोय तसेच योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

ही बाब लक्षात घेऊन या सर्व घटकांना एकाच छताखाली आणून एक सुटसुटीत आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या करारामुळे धर्मादाय रुग्णालये आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत थेट आणि वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची यंत्रणा या संस्थांशी जोडली जाणार आहे. त्यातून रुग्णालयांच्या परिसरात नातेवाईकांसाठी निवारा, अल्पदरात अथवा मोफत भोजन आणि वैद्यकीय मार्गदर्शनाची सोय अधिक प्रभावीपणे केली जाईल.

सर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि त्यांना प्रशासकीय प्रक्रियेत सुलभता मिळवून देणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. यामुळे राज्यातील हजारो गरीब आणि गरजू रुग्णांना व त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या करारामुळे धर्मादाय संस्थांचे योगदान आणि शासकीय यंत्रणांची कार्यक्षमता एकत्र येऊन एक आदर्श आरोग्य सहाय्य मॉडेल राज्यात उभे राहील. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या धर्मादाय न्यासांच्या सहकार्याने विविध 'त्रिपक्षीय सामंजस्य करार' करण्यात येणार आहेत.

त्याचा थेट लाभ रुग्णांना देणे शक्य होणार आहे. त्यासाठी सीएमआरएफच्या वेबसाईटवर सर्व तपशील उपलब्ध असून संबंधित सर्व संस्थांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT