11th admission | अकरावी प्रवेशाचा फेरा कायम, कधी लागणार रिक्त जागांचा क्रम? 
मुंबई

11th admission | अकरावी प्रवेशाचा फेरा कायम, कधी लागणार रिक्त जागांचा क्रम?

८ लाख ८५ हजार जागा अजूनही रिक्त; तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता १२व्या विशेष फेरीद्वारे संधी

पुढारी वृत्तसेवा

पवन होन्याळकर

मुंबई : अकरावीचे वर्ग सुरू झाले, शैक्षणिक वर्षाचा पहिला टप्पाही संपत आला; मात्र अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासाठी विशेष फेऱ्यांचा सिलसिला सुरूच आहे. आता १२ वी विशेष फेरी जाहीर करण्यात आली असून, सप्टेंबरअखेरपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. अकरावी प्रवेशाचा फेरा कायम असून आजअखेर तब्बल ८ लाख ८५ हजार ९४० जागा अद्याप रिक्त आहेत.

सध्या राज्यातील ९,७१८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २२ लाख ४९ हजार ७९ जागा आहेत. यापैकी १३ लाख ६३ हजार १३९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. तब्बल ८ लाख ८५ हजार ९४० जागा अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया नेमकी कधी थांबणार, असा प्रश्न आता महाविद्यालयांकडूनही उपस्थित होत आहे. बाराव्या विशेष फेरीचे २८ सप्टेंबर रोजी प्रवेशाचे वाटप होणार असून, त्यानंतर २९ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार आहे. १ ऑक्टोबरला रिक्त जागा जाहीर करण्यात येणार आहेत.

राज्यातील दहावी उतीर्ण १५ लाख ६२ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत ११ लाख ९५ हजार १४० विद्यार्थ्यांचे, तर कोट्यांतर्गत १ लाख ६७ हजार ९९९ प्रवेश झाले आहेत. अकरावीच्या शैक्षणिक वर्षासाठी स्वयंअर्थसहाय्याच्या नावाने विनाअनुदानित महाविद्यालयांना दरवर्षी नव्याने महाविद्यालयांना मान्यता दिल्या जातात. तसेच अनेक महाविद्यालये तुकड्या वाढवून घेतात. जिथे विद्यार्थी प्रवेशाची मागणी करत नाही अशा ठिकाणी या महाविद्यालयांची संख्या वाढताना दिसत आहे. उपलब्ध एकूण जागांच्या तुलनेत अद्याप मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. गतवर्षी डिसेंबरमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना यु-डायस प्रणालीत समाविष्ट करताना अडचणी आल्या, तर काही ठिकाणी संचमान्यतेत हे प्रवेश ग्राह्य धरले गेले नाहीत. जे विद्यार्थी उशिरा प्रवेश घेतात त्यांचे नियोजन कसे करायचे. प्रवेश प्रक्रियेतील वेळापत्रकाच्या मर्यादा नसल्याने महाविद्यालयांनी नाराजी व्यक्त केली. यंदा राज्य मंडळाचा दहावीचा निकाल लवकर लागला. तरीही अजून प्रवेश लांबले आहेत. फेऱ्यांनंतरही विशेष फेऱ्या आणि त्यानंतर दैनंदिन प्रवेशप्रक्रिया राबविण्याची वेळ वारंवार येत आहे.

विद्यार्थी कुठे प्रवेश घेतात, याचा शोध घेणार : दादा भुसे

अकरावीच्या प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या, अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची नेमकी संख्या किती, तसेच त्यांनी अकरावीऐवजी अन्य कोणत्या अभ्यासक्रमाला किंवा संस्थेत प्रवेश घेतला आहे, याची माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे. याचा शोध घेण्यासाठी विशेष व्यवस्था उभारण्याचे काम शिक्षण विभाग करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. पुढील वर्षापासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT