पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांत महत्त्वाची वास्तू जर कोणती असेल तर ती म्हणजे वर्षा बंगला. मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान म्हणजे हा बंगला होय. राज्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय, राजकीय कटकारस्थाने, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाशी संबंधित विविध क्षण या सगळ्यांचा साक्षीदार म्हणजे हा बंगला. पण हा बंगला सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्र्यांचा नव्हता, तसेच या बंगल्याचे नावही वर्षा नव्हते.
महाराष्ट्राते द्रष्टे नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना पाऊस, शेती, निसर्ग यांच्याबद्दल जिव्हाळा होता. आणि या जिव्हाळ्याचे प्रतिक बनला तो 'वर्षा बंगला'. १९५६ साली वसंतराव नाईक राज्याचे कृषिमंत्री झाले. सरकारने त्यांना 'डग बीगन' नाव असलेला बंगला राहाण्यासाठी दिला. हा बंगला साधा होता, बैठी बांधणी, मोकळे दरवाजे अशी या बंगल्याची धाटणी होती. हा बंगला साधा असला तरी यात एक घरंदाजपणा आणि आपलेपणा आहे, अशी भावना नाईक यांची होती. ७ नोव्हेंबर १९५६ला ते या बंगल्यात राहायला आले. ७ नोव्हेंबर या दिवशी त्यांचा मुलगा अविनाशचा वाढदिवसही होता. राहायला आल्यानंतर त्यांनी या बंगल्याचे नामकरण 'वर्षा' असे केले. नाईक यांना पावसाबद्दल फार जिव्हाळा होता, त्यातून त्यांनी हे नामकरण केले. या बंगल्याच्या आवारात आंबा, लिंब, सुपारी अशी बरीच झाडं नाईक यांनी लावली.
नंतरच्या काळात मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे आकस्मिक निधन झाले आणि ५ डिसेंबर १९६३ला नाईक मुख्यमंत्री झाले. मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपवून नाईक 'वर्षा'वर परत आले. तेव्हा त्यांचे बंधू बाबासाहेब म्हणाले, "शेवटी वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्री बंगला म्हणून लौकिक मिळणार असे दिसते."
नाईक यांच्या पत्नी वत्सलाबाई म्हणाल्या, "आम्ही येथे रुढलोच आहे. आताही काही सह्याद्री नको की विध्यांद्री नको. आपण येथे खूश आहोत." तेव्हा सह्याद्री हा बंगला मुख्यमंत्र्यांसाठी होता.
सरकारवर खर्चाचा बोजा नको आणि भविष्यात आपण मंत्री नसू, म्हणून नाईक यांचा बंगल्यात सुधारणा करण्यास विरोध होता.
२० फेब्रुवारी १९७५ला नाईक यांनी मुख्यमंत्रिपद सोडले. त्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्यातील आपलं वास्तव्य हलवलं. परंतु नाईक यांच्या हृदयातला ‘वर्षा ऋतू’ कायम होता. शेतात राबणाऱ्या कष्टक-यांचाच विचार सर्वप्रथम त्यांच्या मनात आला. त्यांनी आपला मुंबईतील मुक्काम हलवला आणि त्यांनी आपलं पुसद हे मूळ गाव गाठलं.
नाईक यांचा वर्षा बंगल्याशी प्रदीर्घ असा १९ वर्षांचा सहवास राहिला. या काळात मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून वर्षाची ओळख दृढ झाली, त्यांच्या काळात आणि त्यानंतरही महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवर सेंटर म्हणून ओळखले गेले. आजही मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून ‘वर्षा’चं स्थानमहात्म्य कायम आहे. किंबहुना ते अधिक ठळक झालं आहे.