मुंबई : सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सातकलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला. नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच, राज्यातील विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी येणाऱ्या उद्योजकांना कोणाकडूनही आणि कसलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाच्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर सूचना दिल्या. तसेच, या सूचनांवरील कार्यवाहीचा १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाणार असल्याचेही स्पष्ट केले. नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या या तालुका आणि जिल्हास्तरावरच सोडवावेत. असे होत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. यासाठी लोकशाही दिनसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच, राज्यातील विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी उद्योजक येतात. त्यांना कसलाही आणि कोणाकडूनही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही; तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे. यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि उद्योजक यांच्याशी संवाद साधावा, असे फडणवीस यांनी सांगितले.
प्रत्येक विभागाने कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करावे, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या. सोबतच, शासकीय कार्यालयांची स्वच्छता, अनावश्यक कागदपत्रे काढून टाकणे, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करणे, शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृहांची व्यवस्था करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, यासाठी किमान दोन सुधारणा हाती घ्याव्यात, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल याचा प्रयत्न करावा. अधिकारी नागरिकांना भेटीसाठी कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या