Maharashtra CET  pudhari photo
मुंबई

CET College cutoff : पसंतीक्रम भरतानाच दिसणार मागील वर्षाचा कट-ऑफ

सीईटी प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल, महाविद्यालय निवड अधिक अचूक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे ऑनलाईन पसंतीक्रम (ऑप्शन फॉर्म) भरताना विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या महाविद्यालयाचा आणि शाखेचा मागील वर्षीचा पात्रतागुण (कट-ऑफ) त्याच ठिकाणी पाहता येणार आहे. त्यामुळे प्रवेशाची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अधिक वास्तववादी आणि अचूक पसंतीक्रम निश्चित करणे शक्य होणार आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, व्यवस्थापन आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान बहुतांश विद्यार्थी नामांकित महाविद्यालयांना प्राधान्य देतात. मात्र त्या महाविद्यालयांतील कट-ऑफचा अचूक अंदाज नसल्याने अनेक विद्यार्थी अवास्तव पसंतीक्रम भरतात. परिणामी, सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळत नाही आणि अखेरच्या टप्प्यापर्यंत त्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागते.

अनेकांना मागील वर्षाचा कट-ऑफ पाहण्यासाठी स्वतंत्रपणे विविध महाविद्यालयांच्या संकेतस्थळांवर शोध घ्यावा लागत असल्याने वेळही खर्ची पडत होता. ही अडचण दूर करण्यासाठी सीईटी कक्षाने पसंतीक्रम भरण्याच्या प्रणालीमध्येच मागील वर्षाच्या पात्रतागुणांची माहिती समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवेश मिळण्याबाबत विद्यार्थ्यांना समजणार

विद्यार्थी एखादे महाविद्यालय आणि शाखा पसंतीक्रमात निवडताच त्यासमोर संबंधित मागील वर्षाचा कट-ऑफ दिसणार आहे. त्यामुळे स्वतःचे गुण आणि मागील वर्षाचा कट-ऑफ यांची तुलना करून त्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता विद्यार्थ्यांना तत्काळ समजू शकणार आहे. त्यानुसार ते पसंतीक्रमात आवश्यक बदलही करू शकतील. या सुविधेमुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्याबरोबरच विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुकीच्या महाविद्यालय निवडीचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः पहिल्यांदाच प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT