Maharashtra Census 2027 Pudhari
मुंबई

Maharashtra Census 2027: महाराष्ट्रात १० जानेवारीपासून स्वयं-गणना; २५ जानेवारीपासून घरोघरी जनगणना

जनगणनेसाठी राज्यभरात २.८४ लाख प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती; ४० प्रश्नांची डिजिटल प्रश्नावली वापरणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यात १० ते २४ जानेवारीदरम्यान स्वयं-गणना जनगणना होणार असून, २५ जानेवारीपासून घरोघरी जाऊन गणना करण्यात येणार आहे. २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

जनगणनेच्या माध्यमातून संकलित होणारी माहिती पुढील नियोजन आणि विविध विकासकामांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.

राज्यभरात यासाठी सुमारे २.८४ लाख प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. बेघर व्यक्ती, वसतिगृहे, कारागृहे, हॉटेल्स, पेइंग गेस्ट निवासस्थाने तसेच दुर्गम आणि वंचित भागांतील लोकसंख्येची नोंद घेण्यावर विशेष भर देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासाठी ४० प्रश्नांची डिजिटल प्रश्नावली, प्रगणकांसाठी पीई मोबाइल ॲप, ऑनलाइन स्वयं-गणना आणि रिअल-टाइम देखरेख प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

प्रधान सचिव व राज्य नोडल अधिकारी रणजित सिंग देओल यांनी जनगणना दुसऱ्या टप्प्याच्या वेळापत्रकाची आणि राज्यातील तयारीची माहिती दिली. प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या, प्रशिक्षण आणि संबंधित प्रशासकीय प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी जिल्हास्तरीय प्रशिक्षणात सहभागी होऊन कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी शहरी भागातील जनगणनेदरम्यान येणाऱ्या आव्हानांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील सुमारे ५० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत असल्याने स्थलांतर, नागरिकांची सततची ये-जा, दाट वस्ती आणि शहरांचा विस्तार यांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बंद किंवा रिकाम्या घरांसाठी आवश्यकतेनुसार पुन्हा भेटी देणे, प्रगणकांची नियुक्ती व प्रशिक्षण वेळेत पूर्ण करणे, तसेच त्यांना आवश्यक सुविधा आणि मानधन उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT