शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पोलीस वसाहत, पीडब्ल्यूडी व गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी भेट घेतल्याची समजते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना आम्ही जेलमध्ये टाकू. कोरटकर वगैर चिल्लर आहेत. पण पंडीत नेहरूंनी जे महाराजांबद्दल लिहीलं, त्याचा काँग्रेस निषेध करणार का? असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत काँग्रेसवर हल्लाबोल केला.
अबू आझमी यांचे फक्त निलंबन न करता त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
अधिवेशन काळात विधानभवनात सरसकट प्रवेश बंद करण्यात येणार आहे. विधानभवन परिसरातील गर्दी लक्षात घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आदेश दिले आहेत. अत्यंत गरजेच्या कामासाठी प्रवेश दिला जाणार आहे. विधान भवनात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याच्या तक्रारी अनेक आमदारांकडून होत असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला आहे.
समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाचे केलेले कौतूक चांगले भोवले आहे. आज सभागृहात त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तो प्रस्ताव मंजूर झाला असून अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा विभाग संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील उत्तर देत असताना रोहित पवार उभेच होते. त्यावर अजित पवार म्हणाले, मंत्री उत्तर देत असताना तरी खाली बसा, थोडं दमानं घ्या.
विधानसभा अध्यक्षांनी मुंबईतील शासकीय रुग्णालयांच्या कारभारासंदर्भात नाराजी व्यक्त केली. एकवेळ कोर्टाची तारीख लवकर येते, पण रुग्णालयातील येत नाही. रुग्णालयातील सीटी स्कॅन, एमआरआय आरोग्य सेवेसाठी तारीख मिळत नाही. मुंबईतील रुग्णालयातील परिस्थितीची माहिती अधिवेशन संपण्यापूर्वी द्यावी. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दखल घ्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत.
महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक अंबादास दानवे यांच्या दालनात सुरू आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक दिवसभरातील अजेंडा ठरवण्यासाठी सुरू आहे. बैठकीला अंबादास दानवे, सचिन आहेर , बाळा नर, विजय वडेट्टीवार आणि इतर आमदार उपस्थित आहेत.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे, त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना निलंबित करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी आमदारांनीच विधिमंडळाचे कामकाज रोखले.