Municipal Elections 2026 | राज्यात 16 महानगरपालिकांत भाजप-शिवसेना स्वतंत्र लढणार Pudhari News Network
मुंबई

Municipal Elections 2026 | राज्यात 16 महानगरपालिकांत भाजप-शिवसेना स्वतंत्र लढणार

बंडखोरांना शांत करताना दोन्ही पक्षांची कसोटी लागणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महापालिका निवडणुकीमध्ये राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या भाजप - शिवसेनेने 16 महापालिकांमध्ये युती करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने हे दोन पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. सोबतच 13 ठिकाणी या दोन मित्रपक्षांची युती झाली आहे. जिथे या दोन पक्षांची युती आहे, तिथे दोघांनाही बंडखोरीचा मोठा फटका बसला असून बंडखोरांना शांत करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे.

राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महापालिकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती होईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी महायुतीत फूट पडली. महायुतीत एकत्र असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोजक्या ठिकाणी भाजपने सोबत घेतले असून पुणे आणि पिंपरी - चिंचवड महापालिकेत अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर, तर कुठे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवत आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा करून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला तर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काही ठिकाणी घडामोडी घडू शकतात. युतीत झालेली बंडखोरी पाहता या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

मतभेद दोन दिवसांत दूर करू : उदय सामंत

पुणे : भाजपने शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक महापालिकांमध्ये गोंधळ उडाला. पुण्यात शिंदे सेनेचे उमेदवार आणि नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली असे जाहीर केले. मात्र, त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी अजूनही महायुती तुटली नसल्याचे स्पष्ट केले. पुण्यात उदय सामंत म्हणाले, 29 महापालिकांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होत आहेत. मुंबई महापालिकेत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही एकदिलाने काम करत आहोत. कोणत्याही महापालिकेमध्ये महायुती तुटली, अशा पद्धतीचे चित्र नाही. छत्रपती संभाजीनगरला एकमत न झाल्यामुळे पुण्याप्रमाणे चित्र आहे. तेही आम्ही दोन दिवसांत दूर करू. नेतेमंडळींना आपापसात बोलायला वेळ कमी मिळाला. आता तीन-चार दिवस आम्हाला बोलायला वेळ आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठेही गैरसमज करून घेऊ नये. पुढचा निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेतील, असे सांगत सामंत यांनी सुरू असलेला गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT