मुंबई : विधानसभा निवडणुकीवेळी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अथवा संबंधित जागा मित्रपक्षांना सुटल्यामुळे भाजप सोडून अन्य पक्षांत गेलेले बंडखोर भाजप नेते राज्यात भाजपच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर येताच पुन्हा भाजपमध्ये परतण्यासाठी आतूर झाल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी भाजप सोडून गेलेले काही नेते दुसऱ्या पक्षात यशस्वी होऊ शकले नाहीत. ते भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचे कळते. या नेत्यांना पक्षात घ्यायचे की नाही याबाबत भाजपचा मात्र निर्णय झालेला नाही. या मंडळींना परत घेण्यास भाजपमधील एक गट राजी नाही. या बंडखोरांना परत घेतल्यास निष्ठावंतांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असे या गटाला वाटते. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपने संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उभे केले. तथापि, महाविकास आघाडीत बंडखोरी करून काँग्रेस नेते विशाल पाटील हे अपक्ष म्हणून जिंकले. या पराभवानंतरही विधानसभा निवडणुकीत संजयकाकांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तासगाव मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली. तेथेही संजय पाटील पराभूत झाले. ते आता पुन्हा भाजपमध्ये जाण्याच्या प्रयत्नात आहेत.
कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ यांनाच तिकीट मिळाल्याने भाजप नेते समरजीत घाटगे यांनी उमेदवारीसाठी शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का बसला. हर्षवर्धन पाटील यांनीही इंदापूर मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांनाच तिकीट मिळणार असल्याने शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवली. त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला. राजन तेली यांनी भाजपची साथ सोडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या तिकिटावर अयशस्वी लढत दिली. भाजपचे नेते बाळ माने यांनी रत्नागिरीत उदय सामंत यांच्याविरोधात ठाकरे गटात प्रवेश करीत निवडणूक लढली. त्यांनाही अपयश पत्करावे लागले. हे सारे नेते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत.