Delhi Police student lathi charge protest : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी 'वंचित बहुजन आघाडी'ने येत्या गुरुवार, २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. याबाबतची पोस्ट सुजात आंबेडकर यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म फेसबुकवर केली आहे. तसेच सर्व समविचारी पक्ष आणि नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
सुजात आंबेडकरांनी आपल्या पोस्ट म्हटलं आहे की, न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अश्रूधुर, पाण्याचे फवारे आणि खिळे ठोकलेल्या लाठ्यांचा (piked-batons) वापर करण्यात आला. यावरून या सरकारचा हुकूमशाही आणि फॅसिस्ट चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.
या हिंसक पोलीस कारवाईचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलै रोजी संपूर्ण राज्यभर 'महाराष्ट्र बंद' पुकारण्यात आल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
"महाराष्ट्र बंदची हाक वंचित बहुजन आघाडीने दिली असली, तरी हा बंद यशस्वी करण्यासाठी मी सर्व समविचारी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, नागरिक, विद्यार्थी आणि पालकांना एकत्र येण्याचे आवाहन करतो. ही लढाई केवळ उत्तरदायित्व मागण्यापुरती मर्यादित नसून, आपल्या देशाचे भविष्य वाचवण्यासाठीची लढाई आहे."