पुढारी ऑनलाईन डेस्क : Maharashtra Assembly Session | बाजारात ७० टक्के पनीर बनावट असल्याचा दावा भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी बुधवारी सभागृहात केला आहे. बनानट पनीरच्या मुद्द्यावर आमदार पाचपुते विधानसभेत भडकले होते. त्यांनी बाजारातील बनावट पनीर आणि नैसर्गिक पनीर अध्यक्षांना दिले आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली.
आमदार विक्रमसिंह पाचपुते बनावट पनीर घेऊन विधानसभेत आले होते. तुम्ही नैसर्गिक आणि बनावट पनीर खाऊन पाहा, असे म्हणत त्यांनी ते विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले. यावेळी ते म्हणाले की, मार्केटमधील ७० टक्के पनीर हे बनावट आहे. लहान मुलांना आपण अन्न म्हणून पनीरच्या नावाखाली विष खाऊ घालत आहे. हे तेलाचे गोळे आहेत. प्रश्न मांडल्यानंतर धाडी पडल्या. यात १५ लाख किंमतीचे बनावट पनीर पुणे व चंद्रपूरमध्ये सापडले. कायद्यात कठोर कारवाईसाठी तरतूद नाही, ही गंभीर बाब आहे. त्यासाठी खुनाचा प्रयत्नाची तरतूद करावी, अशी मागणी केली.
यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ही अतिशय गंभीर बाब आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रश्न आहे. याबाबत मी एक बैठक लावतो. आमदार विक्रमसिंह यांना बोलावले जाईल. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जेवढा निधी लागेल तेवढा उपलब्ध करून देऊ. बनावट पनीरवर तातडीने कारवाई केली जाईल. वेळ पडल्यास केंद्राच्या संबंधित मंत्र्यांना भेटू. जे राज्याच्या हातात आहे ते करूच; पण, जिथे केंद्राची मदत लागेल तेव्हा ती घेऊ. अधिवेशन संपण्याआधी पाचपुते, मंत्री व संबंधित अधिकारी यांना निमंत्रित करून ठोस कारवाई केली जाईल.