Maharashtra Assembly Monsoon Session Clash
मुंबई : विधीमंडळाच्या लॉबीत गुरुवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आमदार शशिकांत शिंदे यांनी विधीमंडळ परिसरातील वाढत्या गर्दीचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला. विधीमंडळ परिसरात इतकी गर्दी असते की यामुळे महिला सदस्यांना त्रास होतो. विधीमंडळातील पाससाठी पाच हजार, दहा हजार रेट असल्याचाही धक्कादायक आरोपही त्यांनी केला.
वैयक्तिक पातळीवर द्वेष वाढत चालला आहे. कुणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही. बहुमत मिळाले म्हणून सैरभैर होता कामा नये. संख्या किती यापेक्षा विरोधी पक्षाला स्थान काय आहे हेही महत्त्वाचे आहे. याआधी सभागृहात संघर्ष व्हायचा पण तो मर्यादित असायचा. पण आता वैयक्तिक द्वेष वाढतोय, अशीही खंतही शिंदे यांनी सभागृहात व्यक्त केली.
सभापतींनी निर्देश दिले होते की गेटपास बंद करा. मग तरीही पास कुणी सुरू केले? असा सवालही त्यांनी केला. सभापतींची भावना चांगली असेल मग गर्दी कशी झाली? लोक येऊ द्या असं सांगणारा मंत्री कोण? मकोकामधील आरोपी येतो, मारहाण करून जातो. सीसीटीव्ही चेक करा. काल फक्त एकावरच कारवाई झाली. मारहाण केली त्यावरही कारवाई झाली. चंद्रकांतदादांना विनंती आहे की सभागृहाची पत राखावी. कायदेमंडळात आमदार असुरक्षित आहेत. सर्व चर्चा दूर ठेऊन राज्यातील शिस्त, संयम, कायदा सुव्यवस्था यावर चर्चा ठेवा, असेही शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.
अनिल परब यांनीही विधीमंडळ प्रवेशाचे पास विकले जात असल्याचे सांगितले. पहिल्या गेटमध्ये, दुसऱ्या गेटमध्ये पैसे द्यावे लागत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आज दुपारपर्यंत आम्ही नावे देऊ, असेही त्यांनी नमूद केले.
त्यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी उत्तर दिले. ''पास देण्याचा अधिकार हा पीठासीन अधिकारी यांच्या अखत्यारीत येतो. तो अध्यक्ष आणि सभापती यांच्या अखत्यारीत येतो. तुमचे निर्देश तिथे आहेत का? विरोधकांनी नुसते आरोप करू नये. तुम्ही पुरावे द्या, नावे द्या, व्हिडिओ द्या... सांगाल त्या यंत्रणेमार्फत चौकशी करू,'' असे शंभुराज देसाई म्हणाले.
संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितले की, इतका खालचा स्तर गाठला जाऊ नये. विधानसभा अध्यक्ष अहवाल मांडणार आहेत. इथेही कारवाईबाबत निवेदन केले जाईल. स्तर खाली का गेला याचा सर्वांनी विचार करावा लागेल.
त्यावर सभापती राम शिंदे यांनी, दोन्ही सभागृहासाठी घडलेली घटना गंभीर असल्याचे मत व्यक्त केले. यावर काहीतरी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. २८९ अन्वये चर्चा उपस्थित झाली. त्यावर आजच आम्ही निर्णय जाहीर करु, असेही ते म्हणाले.