Maharashtra Assembly controversy
मुंबई: 'अध्यक्ष लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण' अशा तीव्र शब्दात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला. विधानसभेत भास्कर जाधव यांना अध्यक्षांनी बोलू न दिल्याने मविआ नेते आक्रमक झाले आहेत. दरम्यान विधानसभा परीसरात आज (दि.१७) माध्यमांशी बोलताना भास्करराव जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले, "सभागृहात बोलू दिलं जात नाही. अध्यक्षकांनी सरकारला बरखास्त करावे आणि स्वतःच कामकाज करावे. अध्यक्ष दुतोंडी आहेत. अध्यक्ष स्वत:च सरकार असल्यासारखं वागतात. त्यामुळे विधानभवनाला आता लक्षवेधी भवन असं नाव द्यावं, असे म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियमबाह्य काम केल्याचा आरोप देखील जाधव यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात एकाही महत्त्वाच्या मुद्द्यांला हात घातला नाही. अटल सेतू यांनी बांधला, मुंबई एअरपोर्ट तुम्ही केलं, मग उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये हेही होते, तेव्हा ते काय करत होते. उठ सूट त्यांना उद्धव ठाकरे सरकारला जबाबदार धरता. मग तुम्ही काय केलं तर तुम्ही गुजरात, सूरत आणि गुवाहाटीला गेले, अशी टीका देखील भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा रिप्लाय सुरु होता. आतले सिसिटीव्ही काढा. हातवारे करून अध्यक्षांना बोलले. अध्यक्षांच्याबाबतीत असे अवमानकारक बोलणे चुकीचे आहे. आदित्य ठाकरे यांचे हातवारे केलेत ते नियमात बसणारे नाहीत. भास्कर जाधव यांना निलंबित करावे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली.