Devendra Fadnvis Pudhari
मुंबई

Maharashtra Artificial Flowers: राज्यात कृत्रिम फुलांवर बंदी; वापर केल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा; डेकोरेटर्स व मॅरेज हॉल्सनाही जबाबदार धरणार, स्वतंत्र जीआर लवकरच

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : जैविकदृष्ट्या विघटनशील नसलेल्या साहित्यापासून तयार केलेल्या कृत्रिम फुलांवर राज्यात बंदी आहे. अशा फुलांचा वापर केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला. बंदीबाबत अधिक स्पष्टता यावी यासाठी स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) काढण्यात येणार असून डेकोरेटर्स तसेच अशा सजावटीस परवानगी देणाऱ्या मोठ्या मॅरेज हॉल्स आणि इव्हेंट स्थळांनाही जबाबदार धरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे कृत्रिम फुलांचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी याविषयी अधिक स्पष्टतेसाठी जीआर जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार जयंत पाटील यांनीही उपप्रश्नांद्वारे फूल उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. कृत्रिम फुले आणि प्लास्टिक सजावटीच्या साहित्यामधील रसायनांमुळे डोकेदुखी, त्वचाविकार, डोळ्यांची जळजळ तसेच लहान मुलांमध्ये श्वसनाचे त्रास उद्भवतात. दीर्घकालीन संपर्कामुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे संशोधनातून समोर आल्याचा दावा पाचपुते यांनी केला. ही फुले नद्या किंवा इतर जलस्रोतांत विसर्जित केल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक फुले पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितालाही बाधा पोहोचत असल्याचे आमदारांनी सांगितले.

विधानसभेतील या विषयावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, सध्या कृत्रिम फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून ही फुले इतक्या कुशलतेने तयार केली जातात की ती खरी की कृत्रिम हे ओळखणेही कठीण जाते. मात्र या वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे आणि नैसर्गिक फुले उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे यासंदर्भातील कारवाई पर्यावरण विभागाकडून अधिक प्रभावीपणे करण्यात येईल. गरज भासल्यास इतर संबंधित विभागांचाही यात समावेश केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

फूल बाजारांवर बंदी नाही

मुंबई पालिकेने फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईदरम्यान दादरसह मुंबईतील अन्य फुलांचे बाजार बंद केल्याची माहिती सदस्यांनी मांडली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, कोणतेही फूल मार्केट बंद करण्यात आलेले नाही. अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान काही विक्रेते विस्थापित झाले असतील, तर त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील. सनातन संस्कृतीत फुलांना अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याने फुलांचे मार्केट सुरू राहणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेला आवश्यक ते आदेश दिले जातील असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT