Bakri Eid Animal Market Ban (Pudhari Photo)
मुंबई

Mumbai News | राज्यातील जनावरांचे बाजार आठवडाभर बंद ठेवा

Bakri Eid 2025 | बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गो-सेवा आयोगाचे निर्देश, मुस्लीम बांधवांकडून तीव्र आक्षेप

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Animal Market Ban

मुंबई : मुस्लिम बांधवांचा बकरी ईद अवघ्या 4 दिवसांवरयेऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर देशी गाईंच्या संवर्धनासाठी गठीत करण्यात आलेल्या महाराष्ट्र गो सेवा आयोगाने राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना 3 जून ते 8 जून या कालावधीत जनावरांचा बाजार भरवू नये असे निर्देश जारी केले आहेत.

27 मे रोजी बाजार समित्यांना जारी केलेल्या परिपत्रकात गो सेवा आयोगाने म्हटले आहे की, बकरी ईदच्या निमित्ताने मोठ्याप्रमाणात जनावरांची कत्तल केली जाते. त्यांची कुर्बानी देण्यात येते. त्यामुळे 3 ते 8 जून या काळात सर्वत्र भरवण्यात येणारे जनावरांचे बाजार बंद ठेवावेत. जेेणेकरून जनावरांची बेकायदा कत्तल होणार नाही. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू आहे. त्यामुळे याविषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

या कायद्यान्वये गाय आणि बैलांच्या कत्तलीवर पूर्णपणे बंदी आहे. त्याचबरोबर गोमांस बाळगणे दखलपात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीत गाय आणि बैलाची कत्तल होणार नाही यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, संपूर्ण जनावरांचा बाजार कशासाठी बंद ठेवण्याचा घाट घालण्यात आला आहे. या बाजारात बंदी नसलेल्या जनावरांची विक्री केली जाते. त्यात शेळी, मेंढी या व्यतिरिक्त म्हशींचा समावेश आहे. बाजार बंद ठेवला तर या जनावरांच्या विक्रीवरही या काळात बंदी लागू राहणार आहे. त्यामुळे या बाजारावर अवलंबून असणारे शेतकरी, हमाल, दलाल, चालक, मजूर, कुरेशी खाटीक समाज यांचे उत्पन्न ठप्प होणार आहे, अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारूख अहमद यांनी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर गो सेवा आयोगाला बाजार समिती बंद करण्याचे अधिकार आहेत का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. गो सेवा आयोगाला शिफारस करण्याचे आदेश आहेत. त्यापलीकडे जाऊन कोणत्या अधिकारात हा आयोग काम करत आहे, अशी विचारणाही अहमद यांनी केली आहे.

गाईंची कत्तल रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे या आयोगाने स्पष्ट केले आहे. ही बंदी केवळ एका आठवड्यासाठी आहे असे आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी म्हटले आहे. तसेच परिपत्रक केवळ माहितीसाठी काढल्याचे मुंदडा यांनी सांगितले.

महाराष्ट्रात 305 मुख्य आणि 603 दुय्यम कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी विपणन बोर्डाद्वारे संचलित केल्या जातात. त्याचप्रमाणे राज्यात 292 ठिकाणी जनावरांचे बाजार भरतात. हे बाजार देखील कृषी उत्पन्न बाजार समिती नियंत्रित करते. मान्सूनच्या सुरुवातीला शेतकरी आपली जनावरे घेऊन या बाजारात विक्रीसाठी येतात. या विक्रीतून मिळालेले पैसे शेतीच्या कामासाठी तसेच जनावरांच्या खाद्यासाठी वापरतात. तसेच या बाजारामध्ये शेळ्या, मेंढ्यादेखील विक्रीसाठी उपलब्ध असतात. बकरी ईदमुळे त्यांची विक्री वाढते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT