मुंबई : राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून कृषी क्षेत्राच्या विकास दराला फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. 9.1 टक्क्यांवरून वृद्धी दर घसरून 3.4 टक्क्यांवर घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराचाही मोठा फटका शेती क्षेत्राला बसला आहे.
शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाच्या उत्पन्नातही घट झाल्याने त्याचा वृद्धी दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. खरीप पिकांच्या उत्पादनामध्ये 6.6 टक्क्यांची घट अपेक्षित आहे. यामध्ये कडधान्य आणि तेलबियांमध्ये अनुक्रमे 28.2 आणि 29.7 अशी मोठी घट आहे. तांदूळ 4.6, ज्वारी 44.1, बाजरी 30.9, नाचणी 15.8, तूर 29.2, कडधान्य 28.2, सोयाबीन 48.9, भुईमूग 17.1 आणि तेलबियांच्या उत्पादनात 47.4 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे.
कापूस आणि ऊस पिकांच्या क्षेत्रात घट अपेक्षित असून, कापसाचे उत्पादन 10.8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. उसाचे उत्पादन 6.6 टक्क्यांनी घटेल, असे पूर्वानुमान व्यक्त केले आहे. ज्वारी, करडई, सूर्यफूल, जवस आणि तेलबियांच्या क्षेत्रामध्ये घट अपेक्षित असून, उत्पादनातही 22.7 टक्क्यांची घट होणार असल्याचे पूर्वानुमान व्यक्त केले आहे.
खरिपाच्या पेरणी क्षेत्रामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 0.6 टक्क्याने क्षेत्र कमी असून, ऊस आणि मका क्षेत्रामध्ये अनुक्रमे 30.21 आणि 17 टक्क्यांनी वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 2024-25 मध्ये राज्यातील फलोत्पादन पिकांखालील अंदाजित क्षेत्र 25.19 हेक्टर असून, त्यामध्ये 15.9 टक्क्यांनी वाढ झाली. यामध्ये आंबा 1.67, संत्री 1.48, केळी 1.41, द्राक्ष 1.19, डाळिंब 1.7, तर मोसंबीची 0.80 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होती.
सेंद्रिय शेतीत आघाडी कायम
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून सेंद्रिय शेती उत्पादनांना मोठी मागणी असून, राज्यातील सेंद्रिय शेतीखालील क्षेत्र मागील वर्षीपेक्षा घटले असले, तरीही 30 टक्के हिश्श्यासह देशामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.