मुंबई: राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाबाबतची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष 'शहराचा प्रथम नागरिक' अर्थात महापौर पदाकडे लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याची चर्चा होती. दरम्यान नगरविकास विभागाने अधिकृत पत्र काढून महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आता २२ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत पार पडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरविकास विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. ही सोडत गुरुवारी दि. २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मंत्रालय, मुंबई येथील ६ व्या मजल्यावरील 'परिषद सभागृहात' आयोजित करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या प्रक्रियेचे अध्यक्षपद माननीय राज्यमंत्री (नगर विकास) भूषवणार आहेत.
राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांचे भवितव्य या सोडतीवर अवलंबून असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्याच्या काळातच ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याने राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण काय निघणार आणि त्यानंतर महायुतीतील रस्सीखेच कशी थांबणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाअभावी इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र, आता २२ जानेवारीची तारीख निश्चित झाल्यामुळे इच्छुकांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या सोडतीनंतरच राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाण्याची दाट शक्यता आहे.
महापालिका निवडणूकीमध्ये नगरसेवकपदासाठी आरक्षण सोडत काढताना नेहेमीप्रमाणेच यंदाही पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यानुसारच महापौर पदाच्या आरक्षण सोडती होणार असून छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी आतापर्यंत अनुसूचित जातीचे आरक्षण वगळता इतर सर्व प्रवर्गासाठी महापौर पद सुटले आहे. त्यामुळे यंदा रोटेशननुसार एससी प्रवर्गासाठी हे आरक्षण सुटेल अशी शक्यता आहे. परंतु, या प्रवर्गाऐवजी खुल्या व ओबीसी प्रवर्गासाठीच आरक्षण सुटेल, अशी चर्चा आहे.