मुंबई : महापालिकेतील सत्ता स्थापनेत पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या महापौरपदाच्या आरक्षणासाठी गुरुवारी (दि. 22) मंत्रालयात सोडत काढली जाणार असून, त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महापौरपदाच्या पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी ही सोडत आहे. महापौरपदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार आहे. विशेषतः, प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई महापौरपदाच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाईल. या सोडतीत कोणत्या महापालिकेतील महापौरपद आरक्षित झाले आणि कोणत्या महापालिकेत खुल्या प्रवर्गातील महापौर बसणार, हे स्पष्ट होणार आहे.