मुंबई : नांदणी मठातील महादेवी हत्तिणीला गुजरातच्या वनतारामधून परत आणण्यासाठी कोल्हापूरमधील वातावरण तापले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फडणवीस यांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, या प्रकरणामध्ये शासनाने कुठलाही थेट आदेश दिलेला नाही. मात्र, नांदणी परिसरातील भाविकांच्या भावना लक्षात घेऊन ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुळात हा शासनाचा निर्णय नाही. प्राण्यांविषयी काम करणारे कार्यकर्ते आणि संबंधित मठ यांच्यात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली.
यासाठी उच्च न्यायालयाने एक उच्चाधिकार समिती नेमली होती. त्यांनी या हत्तिणीला अभयारण्यामध्ये सोडण्याची सूचना केली. त्यानुसार उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानेदेखील कायम ठेवला. महाराष्ट्रात असे अभयारण्य नसल्याने ‘वनतारा’मध्ये हत्तिणीला ठेवण्याचा निर्णय दिला गेला. न्यायालयीन कामकाजासाठी वन विभागाचा आवश्यक अहवाल तेवढा देण्यात आला होता. त्याशिवाय यामध्ये राज्य शासनाची भूमिका नाही.
दरम्यान या बैठकीबाबत बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, आमची मागणी ही काही झाले तरी आमची महादेवी परत करावी ही आहे. त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर योग्य ती पावले टाकावीत, ही आमची भूमिका आहे.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री गणेश नाईक, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार राजू शेट्टी खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, विशाल पाटील,माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार विनायक कोरे, सतेज पाटील, अमल महाडिक, विश्वजीत कदम, अशोक माने, राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतील कबुतरखान्यांविषयी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने दादरमधील कबुतरखाना बंद केला आहे. यावरही मंगळवारी चर्चा होणार आहे. जनभावना लक्षात घेऊन यातून मार्ग काढता येईल का? असा आमचा प्रयत्न आहे. याविषयी आम्ही अभ्यासदेखील केलेला आहे. उद्या काही प्रमुख लोकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.