मुंबई: महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप आणि स्काय एक्स्चेंजशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक व्यवहारांची चौकशी अधिक तीव्र केली आहे. उद्योगपती विकास गर्ग यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून ७६५.७७ कोटी रुपये वळवण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे.
या पैशांचा वापर अमेरिकेतील सॉफ्टवेअर कंपनी एबिक्स इंक ताब्यात घेण्यासाठी झाल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. आता या व्यवहाराशी संबंधित कथित बनावट आणि मागील तारीख टाकून तयार केलेल्या पुरवणी करारामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
गर्ग यांच्याशी संबंधित एराया लाइफस्पेसेस लिमिटेड आणि विकास लाइफकेअर लिमिटेड यांच्यात १६ ऑगस्ट २०२४ रोजी एक पुरवणी करार करण्यात आला होता.
या करारानुसार, एराया कंपनीने विकास लाइफकेअरला तिच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात हिस्सा दिला नाही आणि ठरलेली रक्कम परत केली नाही, तर विकास लाइफकेअरला एबिक्स इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड या ब्रिटनमधील उपकंपनीतील ५१ टक्के हिस्सा मिळवण्याचा अधिकार असल्याची तरतूद होती.
मात्र, ईडीने उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार, एबिक्स इंकच्या अधिग्रहणाला अमेरिकेतील दिवाळखोरी न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०२४ रोजी मंजुरी दिली. म्हणजेच, अधिग्रहणाच्या मंजुरीच्या १५ दिवस आधीच हा पुरवणी करार करण्यात आल्याचे दस्तऐवजांत दिसते.
त्या वेळी एराया कंपनीकडे एबिक्स इंक किंवा तिच्या ब्रिटनमधील उपकंपनीची मालकी नसताना हा हिस्सा हस्तांतरित करण्याची तरतूद कशी करण्यात आली, असा ईडीचा आक्षेप आहे.
मंजुरीचा अभाव?
ईडीने ३० जुलै रोजी विकास लाइफकेअरच्या कार्यालयात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत झडती घेतली. या कारवाईत २०२४-२५ या आर्थिक वर्षातील संचालक मंडळाच्या बैठकींच्या इतिवृत्तांची तपासणी करण्यात आली. पुरवणी करारावर संचालक मंडळात चर्चा झाल्याची किंवा त्याला मंजुरी दिल्याची नोंद आढळली नसल्याचे ईडीने म्हटले आहे.
कंपनीचे सचिव संजय जैस्वाल यांचा जबाबही नोंदवण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या करारावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली नव्हती. कराराची तारीख, मंजुरीचा अभाव आणि संबंधित जबाब यांच्या आधारे हा दस्तऐवज बनावट व मागील तारीख टाकून तयार करण्यात आल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.
परदेशी गुंतवणुकीतून पैशांचा माग
ईडीच्या आरोपानुसार, कथित बेटिंग व्यवसायातून मिळालेला पैसा एच. एस. तिब्रेवाल यांच्याशी संबंधित परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून गर्ग यांच्या कंपन्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक, थेट परदेशी गुंतवणूक आणि अन्य आर्थिक मार्गांचा वापर करून हे व्यवहार करण्यात आल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.
या निधीचा वापर एबिक्स इंकमधील हिस्सा संपादन करण्यासाठी झाल्याचेही ईडीने म्हटले आहे. गर्ग यांना ईडीने १४ जुलै रोजी अटक केली होती. त्यांच्याशी संबंधित मालमत्ता, कुटुंबीय आणि कंपन्यांची सुमारे ९४०.७७ कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वी तात्पुरती जप्त करण्यात आली होती.
या प्रकरणात आर्थिक व्यवहारांची साखळी, पुरवणी कराराची सत्यता आणि कथित बेटिंगमधून मिळालेल्या पैशांचा कॉर्पोरेट कंपन्या ताब्यात घेण्यासाठी झालेला वापर या बाबींचा तपास सुरू आहे.