पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता अजित पवार गटाचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढला आहे. त्यातच आता महायुतीतील आणखी एक मंत्री विरोधकांच्या रडारवर आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्र्याने एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर १९९५ मधील एका प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेला अद्याप वरिष्ठ न्यायालयाने स्थगिती दिली नसली तरी माणिकराव कोकाटे मंत्रिपदावर कायम आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन दिवसांपासून गाजत आहे. आता महायुती सरकारमधील तिसरे मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एका महिलेने त्यांच्यावर विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप केला आहे, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. वडेट्टीवार यांच्या आरोपांची री ओढत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही मंत्री गोरे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधीमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री, जो रोज व्यायाम करतो, त्याने एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले. दहा दिवस जेलची हवा खाऊन आला. त्याच्यापलीकडे जाऊन न्यायालयात १० हजार रूपयांचा माफी मागून दंड भरला आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागला. विवस्त्र फोटो पाठवलेला तो मंत्रिमंडळात आहे. आणखी एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातील मंत्री आहे, त्याने माजी राष्ट्रपतींची जमीन ढापली. पहिल्या महिला राष्ट्रपती यांची २६ एकर जमीन बोगस प्रमाणपत्र घेऊन ढापली. आज तो मंत्रिमंडळात ताठ माण करून फिरत आहे, असे आरोप वडेट्टीवार यांनी केले आहेत.
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, सातारचे जयकुमार गोरे यांच्याबाबत एक अत्यंत गंभीर स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या एका स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ आणि विनयभंग केला या संदर्भातील माहिती समोर आली आहे. ती महिला पुढल्या काही दिवसात विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे. संजय राठोड मंत्रिमंडळात आहेतच, आता हे नवीन पात्र निर्माण झाले आहे. गोरे यांच्या बाबतीत आलेली माहिती अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. असे विकृत मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत, समोर काही पुरावे आहेत, आता कुठले पुरावे शोधणार आहात. हा नैतिकतेचा मुद्दा आहे. मात्र नैतिकता यांच्या आसपास देखील फिरत नाही. याबाबत सरकार म्हणून काय करणार आहात? हे सगळे प्रश्न केंद्राकडेदेखील पाठवणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनादेखील पत्र लिहून यात लक्ष घालावे, असे सांगणार असल्याचे खासदार राऊत यांनी म्हटले आहे.
कोर्टाने मला निर्दोष मुक्त केले असताना ६ वर्षानंतर प्रकरण उकरून काढण्याचे कारण काय? विरोधकांकडून माझ्या बदनामीचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असून कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. असे जयकुमार गोरे यांनी आरोपानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.