Rajya Sabha Election 2026 | भाजपपासून दूर राहण्याच्या अटीवर शरद पवारांना ‘मविआ’चा पाठिंबा 
मुंबई

Rajya Sabha Election 2026 | भाजपपासून दूर राहण्याच्या अटीवर शरद पवारांना ‘मविआ’चा पाठिंबा

राज्यसभा उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांनी घातली अट

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एनडीए’शी कधीही हातमिळवणी करणार नाही, हे घोषित केले तरच शिवसेना ‘उबाठा’ राज्यसभेसाठी शरद पवार यांना पाठिंबा देऊ शकेल, अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातली होती. मंगळवारी रात्री ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेची इनसाईड स्टोरी ‘पुढारी’च्या हाती लागली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अटीनुसार, विलीनीकरणाची चर्चा मागे पडली ही जाहीर घोषणा झाल्यानंतरच शरद पवार यांच्या उमेदवारीला औपचारिक पाठिंबा दिला गेला. मात्र, यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना ‘उबाठा’चा एकही नेता हजर राहिला नाही. राज्यसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या जिंकून येणार्‍या एकमेव जागेसाठी शरद पवार यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब तर झाले; परंतु त्यांना पाठिंबा देण्यापूर्वी शिवसेना ‘उबाठा’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही अटी घातल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विलीनीकरण करून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘एनडीए’शी हातमिळवणी करणार नाही, असे स्पष्ट वचन पाहिजे, तेही जाहीरपणे पाहिजे, अशी अट मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर ठेवली होती. त्यानंतर बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विलीनीकरणाची चर्चा मागे पडली, असे विधान केल्यानंतरच शिवसेना ‘उबाठा’ने शरद पवार यांच्या राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारीला मान्यता दिली. यासंबंधीची घोषणा करण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात हर्षवर्धन सपकाळ आणि सुप्रिया सुळे यांची जी पत्रकार परिषद झाली, त्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा एकही नेता उपस्थित नव्हता. संजय राऊत हे थोड्या वेळापूर्वीच शरद पवार यांना घरी भेटून गेले, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

...म्हणून आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेला गेले नाहीत

आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांना उमेदवारी दिल्याची घोषणा परस्पर करण्याच्या संजय राऊत यांच्या विधानाला विरोध केल्यामुळे ते या पत्रकार परिषदेत गेले नाहीत, असे समजते.

चक्रे फिरली, उमेदवारी निश्चित झाली

शरद पवार गट विलीनीकरणानंतर नेमकी काय भूमिका घेईल, याबद्दल शिवसेना ‘उबाठा’ने त्यांच्याकडून शब्द घ्यावा, अशी काँग्रेसची भावना होती. यामुळे उद्धव ठाकरे यांनी विलीनीकरणाची घोषणा प्रत्यक्षात येणार नाही. ती जुनी गोष्ट आहे हे सांगायला हवे, असे ठामपणे नमूद केले. त्यानंतर जी चक्रे हलली त्यात जयंत पाटील यांनी विलीनीकरण नाही, अशी घोषणा केली. त्यानंतर शरद पवार यांची उमेदवारी निश्चित केली गेली.

सोनिया गांधी यांनी केली पवारांची उमेदवारी निश्चित

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीबद्दल राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी यांच्याशी सुप्रिया सुळे यांचा सतत संपर्क होतो. संभाव्य विलीनीकरण आणि शरद पवार यांचे वय लक्षात घेता त्यांना आता संधी द्यावी की नको, असा प्रश्न काँग्रेसच्या मनात होता. मात्र, राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यासंदर्भात सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना या वयात उमेदवारी न देणे योग्य ठरणार नाही. चुकीचे संकेत जातील आणि ‘यूपीए’च्या ऐक्यावर त्याचा परिणाम होऊ शकेल, अशी भूमिका घेतल्यानंतर शरद पवार यांची उमेदवारी निश्चित झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT