मुंबई: एका बाजूला ३७ हजार कोटी रुपये खर्च करून सुरू केलेली भुयारी मेट्रो धूळ खात पडलेली असताना आता वांद्रे-बीकेसी-कुर्ला मार्गावर पॉड टॅक्सी (Mumbai Pod Taxi) धावणार आहे; मात्र एवढा मोठा प्रकल्प हाती घेऊन मुंबईकरांच्या डोक्याला ताप करण्यापूर्वी याच मार्गावरून धावणाऱ्या १४ बसमार्गांचा विचारच प्रशासनाने केलेला नाही. वांद्रे-बीकेसी-कुर्ला या मार्गावर सध्या १४ बसमार्गांच्या १ हजार १९८ फेऱ्या दररोज होत आहेत.
हजारो कोटींचे प्रकल्प राबवणे म्हणजेच विकास अशी धारणा असलेल्या राज्य शासनाने मुंबईकरांना कोट्यवधींच्या विकासकामांची भुरळ घालण्याचा सपाटाच लावला आहे. गेल्या काही वर्षांपासून ठिकठिकाणी सुरू असलेली मेट्रोची कामे कमी म्हणून की काय आता पॉड टॅक्सीचा प्रकल्प मुंबईकरांच्या माथी मारण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईतील सर्वाधिक स्वस्त सार्वजनिक प्रवासी वाहन असलेल्या बेस्ट बससेवेच्या पाय आणखी खोलात जात असून बेस्टच्या सक्षमीकरणाचा विचारही प्रशासनाच्या मनाला शिवलेला नाही.
पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या आराखड्यानुसार १३.५ किमीच्या मार्गावर ५४ स्थानके २०४१ पर्यंत बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी ३८ स्थानकांचा पहिला टप्पा २०२७पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि अल्ट्रा पीआरटी या कंपन्या भागीदारीमध्ये हा प्रकल्प उभारणार आहेत. तिकिटाचे दर एमएमआरडीए निश्चित करेल. या कंपन्या प्रकल्पासाठी आवश्यक बांधकाम करतील, यंत्रणा उभारतील, पॉड टॅक्सी चालवतील आणि त्याच्या महसुलातील काही हिस्सा एमएमआरडीएला मिळेल असे नियोजन आहे.
या प्रकल्पात एमएमआरडीएचे पैसे खर्च होणार नसल्याचे सांगितले जात असले तरी खासगी कंपन्यांना कमाईचा मार्ग मोकळा झाला आहे. पॉड टॅक्सीचे उत्पन्न एमएमआरडीए आणि कंत्राटदार कंपन्यांना मिळेल; पण सामान्य मुंबईकरांच्या वाट्याला मात्र, केवळ मन:स्ताप येणार आहे. कारण पॉड टॅक्सी ही उन्नत मार्गिका असून त्यासाठी मेट्रोप्रमाणेच पूल उभारावे लागणार आहेत. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी ३ वर्षांचा आहे. या काळात खोदकामांमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होणार आहे. मेट्रोसाठी लावलेले बॅरिकेड्स आता कुठे हटवले जात असताना पुन्हा या पॉड टॅक्सीच्या बांधकामासाठी रस्ते अडवले जाणार आहेत.