Bus fire Sion Panvel Pudhari
मुंबई

Bus fire Sion Panvel: सायन-पनवेल मार्गावर बर्निंग बसचा थरार; चालकाच्या प्रसंगावधानामुळे 22 प्रवासी बचावले

सर्वच प्रवासी बसमधून खाली उतरले आणि थोडक्यात बचावले.

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे: बंगळुरू येथून अहमदाबादच्या दिशेने जात असलेली खासगी लक्झरी बस रविवारी सायन-पनवेल मार्गावर जळून खाक झाली. या बसमधून 22 प्रवासी प्रवास करीत होते. बसच्या बोनेटमधून धूर येऊ लागल्यानंतर बसचालकाने प्रसांगवधान राखत वाशी टोलनाक्याजवळ ही बस थांबवली. त्यामुळे सर्वच प्रवासी बसमधून खाली उतरले आणि थोडक्यात बचावले.

प्रवासी खाली उतरल्यानंतर काही क्षणात संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशनम जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली.

अहमदाबादच्या दिशेने जात असलेली ही बस रविवारी दुपारी दोनच्या सुमारास वाशी परिसरात आली. बस वाशी टोलनाक्यापासून काही अंतरावर असताना बोटेनमधून अचानक धूर येऊ लागला. हा प्रकार बसचालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने बस थांवबली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले.

प्रवासी बसमधून उतरल्यानंतर काही क्षणात बसने पेट घेतला आणि घटनास्थळी मोठा आगडोंब उसळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत सदर बस पूर्णपणे जळून खाक झाली.

उन्हामुळे वायर तुटली

सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हामुळे बोनेटमधील वायर तापून तुटली आणि नंतर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली, असा अंदाज अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT