मुंबई : आकाशवाणी आमदार निवासातील लिफ्टमध्ये आमदारांच्या पीएसह सहा जण जवळपास पाऊण तास अडकून पडले. गुदमरलेल्या लिफ्टमनला तर हृदयविकाराचा झटकाच आला होता. त्याच्या जागी आमच्यासारखे आमदार लिफ्टमध्ये अडकले असते, तर आज सभागृहात आमच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम करावा लागला असता, असे सांगत आमदार निवासात चांगल्या लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी बुधवारी विधानसभेत केली.
आकाशवाणी आमदार निवासात मंगळवारी रात्री आम्ही दोन-तीन आमदार लिफ्टमधून गेलो. नंतर त्याच लिफ्टने माझे पीए, कार्यकर्ते व इतर असे सहा जण येत होते. ही लिफ्ट मध्येच अडकली. पाऊण तास ते अडकून पडले. त्यातच जीव गुदमरल्याने लिफ्टमनला हृदयविकाराचा झटका आला. नंतर कशीबशी लिफ्ट खाली आली. जुनेच सामान वापरून लिफ्टची दुरुस्ती केल्याची माहिती आहे. आमदार निवासही सुरक्षित नाही. मनोरा आमदार निवासाचे काम कधी पूर्ण करणार, असा प्रश्न पिंपळे यांनी केला. त्यावर, जुनेच सामान वापरून लिफ्टची दुरुस्ती केली का, याची चौकशी केली जाईल आणि तसे आढळले तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. मनोरा आमदार निवासाचे बांधकाम दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण केले जाईल, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.