मुंबई : 15 वर्षांपूर्वी जेजे रुग्णालयाजवळ घडलेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावलेल्या छोटा राजन टोळीच्या दोघा गुंडांना उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने सत्र न्यायालयाने ठोठावलेलया जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करत आरोपींचे अपील फेटाळून लावले. जे.जे. रूग्णालयाच्या जवळील फूल गल्ली येथे पंधरा वर्षापूर्वी 13 फेब्रुवारी 2010 रोजी शकील, मोडक माहिती देणार्या एका व्यक्तीसोबत खुर्चीवर बसले होते. याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने मोडक यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर आणखी तिघे हल्लेखोर तेथे आले. त्यांनी मोडक आणि कुरेशी या दोघांवर गोळीबार केला.
हा गोळीबाराचा थरार सुरु असताना घटनेची माहिती देणार्या व्यक्तीने तेथून भेंडी बाजारच्या दिशेने पळ काढला होता. त्यालाही गोळीबारात दुखापत झाली होती, तर गंभीर दुखापत झालेल्या मोडक आणि कुरेशी या दोघांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या व्यक्तीने रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांपुढे घटनाक्रमाचे वर्णन केले होते. त्याआधारे पोलिसांनी मोहम्मद अली शेख आणि प्रणय राणे या दोघांना अटक केली होती. या प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने 2022 मध्ये आरोपी मोहम्मद अली शेख आणि प्रणय राणे या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आव्हान देत आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपीलावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने आरोपींचे अपील फेटाळून लावताना गुन्ह्याची माहिती पोलिसांना देण्यात फार उशीर करण्यात आलेला नाही. गुन्ह्याची माहिती देणार्या व्यक्तीच्या जबाबावर अविश्वास व्यक्त करण्याइतपत उशीर झालेला नाही, असे निरीक्षण नोंदवत छोटा राजन टोळीला मोठा झटका दिला.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड.प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. 2022 मध्ये दोन्ही आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावण्याचा विशेष सत्र न्यायालयाचा निकाल योग्य आणि तर्कसंगत आहे. त्यात कोणत्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे अॅड. घरत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. तसेच विविध भक्कम पुराव्यांकडे लक्ष वेधले. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. स्वीकारार्ह व ठोस पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींविरुद्ध खटला सिद्ध होत आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने दोघांची जन्मठेप कायम ठेवली.