मुंबई : देशभरात कुष्ठ रुग्णांची संख्या निरंक दिशेने घसरत असताना महाराष्ट्रात मात्र हे रुग्णप्रमाण वाढण्याचीच चिन्हे आहेत. याची दखल घेत राज्यभर कुष्ठरोग आता ‘नोटिफायबल डिसीज’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. यानुसार कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद दोन आठवड्यांच्या आत शासकीय यंत्रणेकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत, सप्टेंबर 2025 अखेर राज्यात 7,863 नव्या कुष्ठरुग्णांची नोंद झाली असून उपचाराखालील रुग्णांची संख्या 13,010 आहे. चालू वर्षाचे आणखी तीन महिने बाकी आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले असले तरी देश पातळीवरील रुग्ण संख्येच्या तुलनेत महाराष्ट्रात नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण गंभीर आहे. 1981 साली देशात दर दहा हजार लोकसंख्येमागे 57.2 रुग्ण आढळत. हे प्रमाण 2025 मध्ये 0.57 वर घसरले आहे. समूळ उच्चाटनाच्या जवळ हे प्रमाण पोचलेले दिसते.
याउलट महाराष्ट्रात 2024-25 मध्ये 14551 सक्रिय रुग्ण होते ते यावर्षीच्या, 2025 च्या सप्टेबरपर्यंतच 13003 आहे.सद्यस्थितीत, सप्टेंबर 2025 अखेर राज्यात 7,863 नव्या कुष्ठरुग्णांची नोंद झाली असून उपचाराखालील रुग्णांची संख्या 13,010 आहे. यामुळेच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य अशा दोन्ही प्रकारात उद्भवणारा हा रोग इतक्यात समूळ नष्ट होण्याची आशा महाराष्ट्रात तरी दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर कुष्ठरोग हा ‘नोटिफायबल डिसीज’ घोषित करत नव्या रुग्णांची नोंदणी संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा ,कुष्ठरोग तसेच स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणे आता सर्व डॉक्टर आणि आरोग्य संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे.
भीती-गैरसमज कायम
कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरीयम लेप्री या जंतुमुळे होणारा आजार असून त्वचा, परिघीय नसा, डोळे आणि इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो. या आजाराबद्दल समाजात अजूनही भीती, गैरसमज आणि भेदभाव कायम आहेत. लवकर निदान न झाल्यास आणि उपचारात विलंब झाल्यास रुग्णांमध्ये विकृती निर्माण होते.
राज्य शासनाने सन 2027 पर्यंत “कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र” उद्दिष्ट ठेवले आहे. संसर्गाची साखळी पूर्णपणे तोडणे, प्रसार शून्यावर आणणे, मुलांमधील विकृतीचे प्रमाण शून्य करणे आणि कुष्ठरुग्णांविषयी समाजातील भेदभाव नष्ट करणे या बाबींचा समावेश त्यात आहे.
कुष्ठरोग, ज्याला हॅन्सन रोग देखील म्हणतात, 2005 मध्ये केंद्राच्या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात अधिसूचनायोग्य रोग म्हणजेच ‘नोटिफायबल डिसीज’ घोषित करण्यात आला होता. त्यापूर्वी तो काही राज्यांमध्येच अधिसूचित होता. 2017 मध्ये हा रोग पुन्हा ‘नोटिफायबल’ घोषित केला. कुष्ठरोगाकडे कलंक म्हणून पाहिले जाते. या आजाराबद्दल भीती, गैरसमज जास्त असल्याने आजवर जवळजवळ सर्व शहरी वसाहतींमध्ये कुष्ठरोग्यांच्या समर्पित वसाहती निर्माण झाल्या. कलंक इतका जास्त होता की कुष्ठरोग्यांना कुष्ठरोगी हा अपमानजनक शब्द म्हणून संबोधले जात असे. हा शब्द नष्ट करण्यासाठीही बराच काळ लढा द्यावा लागला.डॉ.ईश्वर गिलार्डों, संक्रामक रोग विशेषज्ञ, यूनिसन मेडिकेर तथा रिसर्च सेंटर मुंबई.