पुढारी ऑनलाईन डेस्क : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी (Baba Siddique murder) यांची शनिवारी रात्री वांद्र्यात खेरवाडी सिग्नलवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने (Lawrence Bishnoi gang) स्वीकारली आहे. बिश्नोई गँगमधील एका सदस्याने फेसबुक पोस्ट केली असून ती व्हायरल झाली आहे. त्यात असे म्हटले आहे की सिद्दीकी यांचे बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि अनुज थापन याच्याशी असलेल्या संबंधांमुळे ही हत्या झाली आहे.
'त्यांना सलमान खान सोबत कोणतेही शत्रुत्व नको होते. पण बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे कारण त्यांचे दाऊद इब्राहिम आणि अनुज थापन याच्याशी असलेले संबंध ठरले, असा दावाही बिश्नोई गँगने पोस्टमधून केला आहे.
फेसबुक पोस्टमध्ये गँगमधील एका सदस्याने लिहिले आहे की, "ओम, जय श्री राम, जय भारत,"..."मला जीवनाचे सार समजले आहे आणि मी संपत्ती आणि शरीराला धुळीसमान समजते. मला जे योग्य वाटले ते मी मैत्रीचा मान राखत केले."
बिश्नोई गँगने फेसबुक पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते. पण तू आमच्या भावाचे (लॉरेन्स बिश्नोई) नुकसान केले आहेस. आज बाबा सिद्दीकी हे सज्जन असल्याचा आव आणला जात आहे. पण ते कधीकाळी दाऊद सोबत मोका कायद्याखाली होते. त्यांच्या मृत्यूचे कारण म्हणजे दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडल्याचे होते.'' तसेच या शिवाय पोस्टमध्ये अनुज थापन याच्याही नावाचा उल्लेख केला आहे. ज्याने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. त्यानंतर पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू त्यांचा बदला असल्याचे गँगने म्हटले आहे.
दरम्यान, व्हायरल झालेली ह फेसबुक पोस्ट पोस्ट खरी की आहे की खोटी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई पोलीस या पोस्टची सत्यता पडताळून पाहात आहेत. 'शुबू लोणकर महाराष्ट्र' नावाच्या अकाऊंटवरून ही फेसबुक पोस्ट करण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकी (Baba Siddique murder news) यांची शनिवारी रात्री वांद्र्यात खेरवाडी सिग्नलवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोन परप्रांतीय शूटर्सना पोलिसांनी अटक केली आहे. गुरमेल बलजीत सिंग (वय २३, हरियाणा) आणि धर्मराज राजेश कश्यप (९, उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी चौकशीदरम्यान, ते कुख्यात गँगस्टर्स लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील असल्याचे म्हटले आहे, अशी मागिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर झालेल्या गोळीबारात बिश्नोई गँगचा हात होता. याच गँगने बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्याचा संशय आहे. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी हत्या घडवून आणण्यासाठी गेली दीड ते दोन महिन्यापासून या परिसराची रेकी केली होती, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
मुंबईत दोन्ही शिवसेनेंचे दसरा मेळावे सुरू असतानाच बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच हा भयंकर प्रकार घडला. अकस्मात अवतरलेल्या तिघा मारेकऱ्यांनी अत्यंत जवळून चार ते पाच राऊंड फायर केले आणि हल्लेखोर पसार झाले. त्यापैकी दोन शुटर्सना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दोघे शूटर्स हरियाणा आणि उत्तर प्रदे-शातील असून या हत्येमध्ये एका बड्या गँगस्टर्सचा हात असावा या प्राथमिक निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत.