मुंबई : विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) निवड यादी शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झाली. या निवड यादीनुसार महाविद्यालयांचा पंसतीक्रम भरलेल्या 40 हजार 323 विद्यार्थ्यांपैकी 14 हजार 988 विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीसाठी निवड झाली आहे. प्रवेशाची संधी मिळालेल्या या विद्यार्थ्यांना उद्यापासून प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
विधी तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी कक्षाकडून 2 ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली. तर 3 ते 5 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी मुदत दिली. गुणवत्ता यादीत निवड झालेल्या 44 हजार 583 विद्यार्थ्यांपैकी 40 हजार 323 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरला होता. पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांची शुक्रवारी रात्री उशीरा निवड यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये 14 हजार 988 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये 7 हजार 570 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. तसेच 7 हजार 418 विद्यार्थ्यांना अन्य पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.
शुक्रवारी निवड यादी असली तरी त्यानंतर रक्षाबंधन व रविवार अशा दोन सलग सुट्या आल्याने विधी तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 11 ऑगस्टपासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 11 ते 13 ऑगस्ट या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.
गुणवत्ता यादीतील विद्यार्थी- 44,583
पसंतीक्रम भरलेले विद्यार्थी- 40,323
पहिल्या फेरीत निवड 14,988
पहिली पसंती 7,570
अन्य पसंतीक्रम 7,418